आता गाडी बेलवंडी फाट्याच्या पुढं निघाली. पुणे नगर हायवेनी. चाकं पाण्याने काळी चकाचक झालेली. चर्रर्रर्र आवाज करत पाणी उडवत होती. तसंही गाडीचा वर्षभराचा इटाळ पावसाने भिजल्याशिवाय निघत नाही. हे म्हणजे गाडीचं अभ्यंगस्नान. हायवे असला तरी आपल्या डाव्या साईडला इथून तिथून पाणी साचलेलं. ते पाणी जास्त असेल तर तंगड्या वर करणे. गाडीच्या उजेडात पुढं फूटभरच दिसत होतं. पावसाची सर कंटूनी चालूच. सोबत हवेचे झपके येत होते. वाडेगव्हाण गेलं, गोळीबार फाटा गेला. पुढं चिंभळ्याचा डोंगर सोडा, मागून आलेली गाडी रापक्यास पाणी उडवल्याशिवाय दिसत नव्हती. गाडी घाटाला लागली. तवर आमची बॉडी पूर्ण भिजलेली नव्हती. बॉडी भिजणं महत्वाचं नसतंय पावसात. अंडरप्यांटीत पाणी शिरणं सफिशियंट असतं. तोपर्यंत कसला बी अंटू फंटू पावसात भिजतो. एकदा का अंडरप्यांटीत पाणी शिरलं, की विषय खल्लास. तुम्ही इंस्टाला फोटोमागं कितिबी KGF चं रॉकिंग टाईप music टाकत असाल, पण पावसात आतमध्ये पाणी शिरल्यावर तिथून पुढं तुमची खरी मंजिल, ध्येय, चिकाटी, लाथ मारीन तिथं पाणी काढीन वगैरे सगळा खेळ सुरू होतो. हे फिरायला जाणाऱ्या पोरांना चांगलं माहीत आसंन. वरून पावसाचे गार सपके आणि आत ऊब न उरणे. माणूस आपोआप डान्स करायला लागतो. मग हँडलला वाऱ्याचे झोके आणि आपला काकडा डान्स यांच्या कसरतीत कसातरी दाबून धरायचा. अशा टायमाला माणूस माझ्यावाणी रगाट आसंन् तं जमतं, नायथं वात येऊन आकडी भरायचे चान्स अस्तेत. घाटात वारं गाडी चढुच दिईना. पोरांना विज्ञानात अपोझिंग फोर्स शिकवायला लंय मजा वाटली होती. आता त्याचंच प्रॅक्टिकल चालू होतं. खाली उतरून ढकलू का काय असं वाटत होतं. पण कुढं टाईमपास करता, एकतं वरून पाऊस चालूय. त्यात अंधार. बळंबळं गाडी, म्हणजे गाडीसोबत आम्ही पण घाट चढून वर गेलो. माऊल्याला जोरात वरडून म्हणलं, "थांबायची का इथं जातेगाव फाट्याव ?" "का..य ?" "आरं इथं थांबायची, का चालू देऊ असंच ?" "नको मरूंदे, चल हळूहळू". इथं 'मरूंदे' चा साधा सरळ अर्थ नाय घ्यायचा. खतरनाक स्ट्रगल असतंय ते. गाडी गपक्यास पांढऱ्या पट्ट्याव जायची. हायवे च्या फोर व्हीलर गाड्या सुद्धा थांबलेल्या होत्या कडेनं. ज्या पार्किंग लाईट लावून चालू होत्या त्यांना आम्ही ओव्हरटेक करीत होतो. पावसात अडकल्याचा गम एका बाजूला आणि आयुष्यात बुंगाट ओव्हरटेक करून जाणाऱ्या चारचाक्यांना ओव्हरटेक करायचं सुख एका बाजूला. ईजा चमकत्यात, का त्यांचा आवाज होतोय, का कोणत्या गावापरेंत पोचलोय ह्यांच्याकडं लक्षच द्यायचं नाही. आपली दोन फुटावर दिसणारी गाडीची लाईट आणि आपली गाडी, एवढंच सांभाळायचं प्रत्येक शेकंदाला. तरीबी एखादी वीज बेकार चमकायची आणि आपण कुठंय त्या झपक्यात पाहून घ्यायचं. सगळं चमकदार दिसतं एकदम. डिओ च्या जाहिरातीत दाखवतेत ते 'डर हैशियत नहीं, हिम्मत देखता है' टाइप शीन होता एकंदरीत. एका विजत किती वॅट लाईट असंत असणार याचा आपण फक्त अंदाज लावायचा. तरी आम्हाला लंय कंड. अजूनपर्यंत अजिबात थांबलो नाही कुठंच. खरा शीन तो अभी बाकी था.
अजून निम्मा पण रस्ता संपला नव्हता. निम्मा टप्पा येतो साधारण सुप्यात. आता म्हसने फाट्याचा टोलनाका आला. खाली गोणीतला 'पिशी' किती भिजलाय याचा अंदाज नव्हता. गोणी तशी वाटरप्रूफ होती. त्यामुळं म्हटलं आता जे होईन ते होईन. एखांद्या गोष्टीचा लंय बाऊ करणं आम्हाला कधी जमलं नाय. जमत पण नाय. पर्सनली मला तरी. एका शेकंदात मोक्कार विचार येऊन जातात अशा टायमाला. मधेच पाणी जास्तच साचलेलं ऱ्हायचं, ह्ये भली मोठी लाट उडल्यावाणी पाणी चर्रर्रर्रकन् ! उडायचं वर ९ १० फूट. असंच जास कमी करत करत गाडी चालत राहिली. कुठं होतो माहीत नाही. गाडीचं स्पीड असंण 30-40. ह्या स्पीडनी गाडी शिरली एका डबक्यात. सवयीप्रमाणे तंगडी वर झाली. आत्तापर्यंत पांढऱ्या पट्ट्यामुळं काहोईना अंदाज लागत होता पण आता इथं पांढरा पट्टा दिसलाच नाही. म्हटलं चालुद्या, एवढं डबकं गेलं की दिसेल पट्टा. पाण्याचा अंदाज येण्याचा सोर्सच नव्हता. २ फूट लाईटीत किती दिसणार ? गाडी सरकत राहिली, पाणी वाढत गेलं, वरती उडणारी लाट वाढली, जशी तंगडी वर झाली तशी गाडी विमानाने take off करावा तसं पुढून उचलून डबक्यावर तरंगली, स्पीड मुळं. झाक्या नाही टाकत, खरंच अक्षरशः तरंगली, विदिन अ मिनीसेकंद हे सगळं. खाली ब्रेक दाबायचा सोडून पाय वर झाले, हाताने हँडल दाबतोय, पुढचा ब्रेक दाबतोय, ते चाक तर हवेत ! ब्रेक लागणार कसा ? मागं माऊल्यासारखा तगडा माणूस. म्हंजे अजून उरळली. गाडी चांगल्या मोठ्या डबक्यात गेलीय हे कळून चुकलं. मागचा ब्रेक दाबायला पाहिजे होता. गाडी तरंगली तशी दोघं बी ओरडलो. ह्या ओरडण्यात नेहमीचा चेव होता, हसू होतं, थ्रिल होतं आणि भीती सुद्धा ! जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये शेवटचा शीन आहे, जीवघेणा रेड्यांचा खेळ. त्या टाईप काहीतरी. कुठं गंडल्यावर पोट भरून कव्हरही हसणे आमचा गुणधर्म. अंगावर काटा येऊन गेला असेल, एवढं बारीक कोण लक्ष देणार. "आयो, गाडी थांबवंय ! ब्रेक दाब ब्रेक दाब", माऊल्या ओरडला. त्याच काही शेकंदात रस्ता कुठंय हे कळंना, पडलो तर पडुदे पण रस्त्यावं पडलो तर मेलो. मागून आलेल्या गाडीवाल्याला पण २ फुटच दिसत असणार. आपण चिरडले जाणार. आता काय खरं नाय. पुढं फक्त गढूळ पाणी दिसत होतं. मागं काही डबकी गेली होती पण अशी नव्हती. पण पुढच्या काही सेकंदात पाण्यानीच गाडीचं स्पीड हळूहळू कमी झालं. पुढचं चाक खाली खाली जात जमिनीला टेकलं आणि आपण किमान कुठल्या गटाराऐवजी सपाट जमिनीवर हेत अजूनतरी हे कन्फम झालं. जीवात जीव आला. गाडी अजून डबक्यातच होती, चांगलं गुडघाभर पाणी आसंल. पाऊस काय थांबलेला नव्हता. अशीच चालू गाडी डबक्याबाहेर निघाली. पांढरा पट्टा दिसला. गाडी थांबवणं आमच्या स्वभावात नव्हतं. गाडी सुरूच. डावीकडं एका हॉटेल ची लायटिंग दिसली. ते हॉटेल 'पंचशील'. म्हणजे आपलं असं जंगी स्वागत सुप्यात झालंय तर ! आमची स्वारी सुप्याच्या परगण्यात पोचली होती. म्हणजे निम्म्या रस्त्यात.
आता बॅकग्राऊंडला कसलंच मोटिव्हेशनल सॉंग नव्हतं, पाऊस मात्र होता. त्याच्या थेंबा थेंबात केसर का दम... सॉरी सॉरी त्याच्या थेंबा थेंबात सँडीप मिश्वरी संचारलेले असावेत. ते बुंद साधे नव्हते, मोटिव्हेटेड होते. आमच्यावर अभिषेक घालत होते. म्हणूनच आमच्यात हे तेजःपुंज भिनलं होतं शायद. जणू आम्ही काहितरी ईश्वरी काम करण्यासाठीच सुप्याच्या परगण्यापर्यंत पोचलो. आणि तिथून पुढं कूच करणार होतो सुप्याच्या 'कला केंद्राकडे' नाही, तर त्याच्या शेजारून जाणाऱ्या घाटाकडे. मग तिथून पुढं मुळव्याधवाल्या जिवंत जादूचा कॉर्नर न् ते ओलांडून पुढं कामरगावात. जनरली आम्ही दोघांनी (माऊली अन् मी) ह्या रस्त्यानी लंय वेळा येढं मारलेले. त्यामुळं खड्डे खुड्डे साधारण पाठ होते. जनरलीच गाडी हाकायला मीच असायचो, कधी सोबत मोठ्यानी गाणी म्हणत, कधी लंय शान्हं झाल्यावाणी समाजाला मूर्ख म्हणत, स्वतःला लंय लकी म्हणत, कधी लैच कमनशिबी म्हणत तर कधी मागं बसल्या बसल्या माऊल्याचं माझ्या मैत्रिणीसोबत नेमकं काय गुलुगुलू चाललेलं असणार याचा अंदाज बांधत झालेल्या प्रवासांसारखा हा प्रवास नव्हता. पावसाचा हैदोस, वाऱ्याचं गार सपकं, डोळ्याला मोतीबिंदू झाल्यावाणी बळंच रस्ता चाचपडत, लाईटीचा आकडा हालून व्होल्टेज कमी जास् व्हावा असं व्हलगडत व्हलगडत चाललेला हा सुसल्याच्या पिशी सोबतचा प्रवास म्हंजे आमच्या रिअल लाईफची रिअल इमेजच होती. जास्त झाक्या टाकण्यात वेळ न घालवता आम्ही कामरगावात आत्तापर्यंत जशे आलो तसंच कामरगावात पोचलो हे सांगून टाकतो. कामरगावची आमच्यासाठी पेशल ओळख म्हंजे इथली गावरान मिसळ. फ्रॅंक उंडरवूडचा जसा 'फ्रेडी' वाला एकच अड्डा, तसा मिसळीचा आमचा हा अड्डा. बाकी वडापावचा शेपरेट अड्डा नगरमध्ये. आपण प्रवासात हेत, पाऊस पडतोय, सगळे छोटे मोठे अवयव सुरकतून गोठलेल्या अवस्थेत असताना या गरमागरम मिसळीला कोण विसरणार ? पण आठवून तरी काय करणार ह्या अंधारात ! पुढं सुप्यासारखंच भरगच्च शाम्पल वाढून ठेवलेलं होतं, हे आम्हाला दोन फूटी लायटीत काय कळणार होतं ? मिसळ नाही भेटली म्हणून काय झालं, कामरगावातल्या सलग 5 6 वरंभ्यांन्नी म्हंजे स्पीडबेकरांनी आमच्या बुडाच्या संवेदना थोड्या जागृत केल्या. गाडी आता वढावी लागणार होती, पुढं चढ आहे. तशी ती वढली, सुसल्याच्या 'पिशी' चे हाल आता विसरलो होतो. 30-40-45 करत गाडी शिरली शेम सुप्याटाईप एका डबक्यात. पुन्हा एकदा आमच्या हिरो ने 2 3 फूट उंच take off केलं, सोबत माझ्या तंगड्यांच्या बी धुऱ्या वर झाल्या आटोमॅटिक. परत चाक खाली दाबण्याची धडपड आणि ती उलघाल आणि भीती आणि आमचं बेकार हसू सगळं पावसात सेकंदाच्या आत विरघळून जात होतं. हे वाढून ठेवलेलं शाम्पल अजून वाढलं, शेजारून आमच्या सारखंच कुणीतरी गैराट मागून फुलस्पीडात फोरव्हीलरनी आलं. आमच्यावर त्सुनामीची लाट फेकून मारली आणि आम्ही थेट साईडपट्टीवर. आम्हाला कळलं ते चिखलामुळं. अजूनपर्यंत चिखल आणि चाकांचा कसलाच संबंध नव्हता. मात्र आताचा हा त्यांचा अनैतिक संबंध आमच्यासाठी कसरतीचा होता. स्पीड कमी झालेलं होतं. गाडी पार थांबल्यात जमा होती. दैठण मधून निघून आता ह्या कामरगावात पाय टेकवावा लागलं. डाव्या पायाने पट्ट्या खटाखट कमी केल्या. आणि पहिल्या पट्टीत गाडी वढली तशी गाडी मार्गावर लागली.
गाडी बंद पडणे, लॉक होणे, पेट्रोल बिट्रोल, हवा बिवा जाणे असलं काहीच घडलं नाही इथपर्यंत तरी हे लंय चांगलं होतं एका बाजूनी. परत जीवात जीव आला. खरं तं जीवात जीव वालरेडी असतोच पण हा वाक्प्रचार तयार झाला तव्हा जाश शोध लागलेले नसतील. असूंद्या, आम्ही जिवंत होतो. गाडी पुन्हा निघाली. डोर पिच्चरमधलं "ये हौसला कैसे झुके" म्हणावं वाटलं होतं मोठ्यानी पण गारठ्यानी दातांची वेगळीच खडीमशीन चालू होती. त्यात बोलायचं म्हणजे जीभ अडकण्याची दाट शक्यता. म्हणजे संभाषण नव्हतंच आमच्यात. गाडी माझ्याकडं, माऊल्याचा जीव त्याच्याकडं आणि सुसल्याचा 'पिशी' गोणीमध्ये लटकत. अशी निवांत गंम्मत चालू होती एकंदरीत. रात्रीचे साडेआठ नऊ वाजले असतीन. वजंवजं आमची गाडी चास, मग २ ३ चढ उतार करत करत अस्सल खड्डेमय जगात पोचली. म्हणजे नगरात. सोबत वरंभ्यांची रिफ्रेशमेन्ट होत राहिली. इथले खड्डे सुद्धा आमच्या तोंडपाठ होते. कुढंमूढं स्ट्रीट लाईटमुळं फायदा होत होता. इलेक्शन यायचं बाकी होतं त्यामुळं अजून त्या खांबांला जुनेच झेंडे लटकत होते. झेंडे कसले ? काळेझार पडलेली लक्तरंच ती. आताशा तळहात, पायांसह काही अवयव पार बधिर झालेले. त्यांना ऊब मिळण्याशिवाय पर्याय नव्हता. एवढं सगळं रामायण घडलं असलं तरी "तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता !" असं झालं होतं आमचं. पावसाने आमच्यावर बरेच उपकार केलेले होते, करत होता अजूनही. ते उपकार आम्ही कशे फेडणार ? हा प्रश्न होता. तिकडे त्याचा 'पिशी' ठेवायला जावा लागणार होतं. सुशील न् कंपनीचं ऑफिस इकडं आल्याडंच होतं आत्ताच्या VRDE चौकात. तेजस सरांचं ऑफिस कम फ्लॅट. तिकडं गाडी वळवली. सगळे अंगावरचे कपडे फदफदत होते, पण बॅगामधलं सामायिन किती डुबक्या घेत होतं हे पाहणं औत्सुक्याचं होतं या ठिकाणी. गाडी लावली एका स्टँडवर. हात बीत झटकले, हेम्लेट काढलं, ते बी भिजून जड झालं होतं. मंग इथं आम्ही एकमेकांची तोंडं पाह्यली आणि दोघंबी सुद्धीवर हेत याची एकमेकांना खात्री झाली. १ मिंटाचा पॉज गेला आसंन्, मग जोरात खिदळून घेतलं दोघांनी. चालायला लागलो तं बारीक पोरांला पचाक पुचुक ची बूटं आणत्यात तशी आमची बूटं आवाज करू लागली. (वेगळं काही उधारण देऊ शकत नाय) आमच्या पाऊलखुणा म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेतून निसटून आलेल्या पराक्रमी वीरांचे ठसे होते, असं म्हणून मी बिलकूल बोर करणार नाही.
वरती गेलो, पोरांनी जंगी स्वागत केलं. निखळ हसून घेतलं आमच्यावर. आम्ही बी हसलो. त्यांना आमच्या ह्या स्टोऱ्या सांगत बसायची येळ नव्हतीच. पलीकडं पोर्चमधी जाऊन सगळं पिळून काढावा म्हटलं, आमची ही ओली बाचकी सोडता येतील, तर तिथं बी पाणी शिरलेलं. बॅगांमधी आणलेल्या खाद्यासकट टॉवेल न् महत्वाचं म्हणजे पर्यायी अंडरप्यांटी सुद्धा ओल्या झाल्याने आता खरी दानदीन सुरू होणार होती. असं सगळंच एकदम जुळून आलेलं आमच्या नाड्या आवळण्यासाठी. पण आम्ही अजूनही थाऱ्यावर आलो नव्हतो. जरा जास्तच गारठल्यामुळं आमच्याइतके Cool आम्हीच असं आम्हाला वाटत होतं. घरी फोन करून पोचलो एवढंच कळवलं. 'थोडं भिजलो' हे चवीला म्हणून सांगावं लागलं. नंतर रूमवर गेलो की तिथंच झोपलो, हे काय आठवत नाही आता. पण मेन गोष्ट म्हणजे सुसल्याचा 'पिशी' आम्ही सुरक्षित पोचवला होता. थोडा ओलसरपणा असणारच. तो कोरडा करण्याजोगा होता. तरीबी सुशील सरांचे "कशाला आले मंग आधीच पाऊस होता तं ? ह्या..य..रं येडी.." "आसं कशाला आणायचा मंग, ह्ये असा ठेवायचा ना पिशी मंग नसता भिजला" हे काही मोलमाघाचे सल्ले ऐकावा लागले. बाकी आम्ही अनुभवलेलं अचाट रौद्ररूप अनुभवायची चटक लागावा असं ते भयानकतेतलं सौंदर्य होतं. नंतर इम्रान खानचा Life of pi असाच बाहेर पाऊस सुरू असताना, अंधारात वगैरे फुल्ल माहोल मध्ये पाहिला, तेव्हा आमचा हा प्रवास आठवून लोक अशा सीन्सचं किती काटेकोर दिग्दर्शन करतात हे जाणवलं. हे पडद्यावरचं जग. पडद्याखाली आक्खं कुटुंब घेऊन जगणारी पालं सुद्धा आठवायला पाहिजेत. गेले २ महिने विहिरी उकरायला आलेली पालं वस्तीपासून तुटाक खाट्या रानात झोपड्या ठोकून बसलेली हेत. तौक्ते वादळाच्या टायमाला त्यांचा ताडपत्री उडाल्याचं कोणीतरी बैठकीत सांगत होतं. त्यांचे हाल वेगळे नसतील. काल उसात २ बिबटे पाहिले तं त्यांना सांगून आलो. बिबटे आलेत म्हणून, सावध ऱ्हातील. स्वतःला सामान्य म्हणवून घेताना त्यांना अतिसामान्य म्हणायचं का अजून काही, माहीत नाही. बाकी आमचा हा अनुभव पहिला नव्हता, हे सांगायला पाहिजे. पहिला अनुभव पावसाचा नव्हता तर थंडीचा होता. ते बी कधी आलं डोक्यात तं लिहू म्हंतो.
इति "पिशी" पुराण समाप्त !
Comments
Post a Comment