'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'
पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार
समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे
सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.
हे सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - वाट आणि वळणे' हे पुस्तक साहित्य क्षेत्रात दर्जात्मक साहित्य निर्मितीचा आग्रह धरणारे असल्याने फक्त साहित्य क्षेत्रच नव्हे तर इतर दर्जात्मक पातळीवर ढासळत चाललेल्या शैक्षणिक क्षेत्रांना देखील जाग आणून देणारे आहे, मार्गदर्शक आहे. भारत आणि एकूणच जगभरातही पदव्यांसोबतच 'शोधनिबंध' किंवा Research Papers ही सुद्धा आजच्या काळात विकत घेण्याची वस्तू झालीय. त्यांचेदेखील स्वतंत्र दरपत्रक असावेत. स्वतः अभ्यास किंवा कष्ट करून पदवी किंवा कुठलीही गोष्ट मिळवण्याच्या प्रवृत्तीची कीड शैक्षणिक क्षेत्राला देखील बाधलीय. सरकारने, सरकारी कार्यालयांनी अधिकाऱ्यांना नेमून दिलेली कामे किमान कागदोपत्री पूर्ण केली म्हणजे पुरेसं, हीच मानसिकता शाळा महाविद्यालयांमध्ये देखील आहे. आम्ही विद्यार्थी स्वतः कार्यानुभव, व्यक्तिमत्व विकास असे शैक्षणिक प्रकल्प एकमेकांच्या वह्यांचे फक्त नाव असलेलं पान बदलून ते पूर्ण केल्याचा सुस्कारा सोडतो. शिक्षक, प्राध्यापक देखील 'विद्यार्थ्यांनी एवढं केलं तरी खूप !' ही तोकडी अपेक्षा ठेवतात. आणि अशाच प्रकारे प्रयोगवह्या (Journals), Home Assignments एवढंच नव्हे तर सर्वच क्षेत्रातल्या कसल्याही प्रात्यक्षिकांच्या नोंदीदेखील ते केल्याविनाच लिहिल्या, नोंदवल्या जातात.
अगदी हेच साचलेपण साहित्य क्षेत्रात आणि मराठी व इतर भाषाविषयांच्या पदवी शिक्षणात आहे. BA आणि MA इथपर्यंतच्या विद्यार्थी दशेत मागील विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या वह्या, नोट्स जशाच्या तशा उतरवून घेणं, मार्क्स मिळवणं हे 'मार्कवादी' शिक्षण व्यवस्थेला सामान्य वाटू लागलंय. परंतु एखाद्या एम फिल, पीएचडी ला असणाऱ्या गृहस्थाने पदवी मिळवण्यासाठी सुद्धा अशाच कॉपी पेस्ट सदृश्य शोधनिबंध, प्रबंध किंवा विषेशलेख लिहून सादर करणं हे त्या भाषेच्या साहित्याचं वैयक्तिक नुकसान आहे. पुस्तके लिहिली जातात, शोधनिबंध, प्रबंधही लिहिले, अभ्यासले जातात. परंतु तरीही त्या भाषेचा, वेगवेगळ्या घटकांचा विशेष अभ्यास करून दरवर्षी अनेक लोक या साहित्यात मोलाची भर टाकत असतात, आणि हेच अपेक्षित असतं. कारण मला एखादा विषय ज्या दृष्टिकोनातून समजला, मी तो मांडला, तसाच पुढे येऊ घातलेल्या पिढीतील व्यक्तीलाही ती वेळ, काळ, वातावरण लक्षात घेता तसेच आकलन होईल, तो तसाच तो विषय मांडेल हे अपेक्षितच नाही. हेच व्यक्तीनुसार, काळानुसार बदलत जाणारे नावीन्य, सर्जनशीलता याची श्रीमंत आणि अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने साहित्याला गरज असते. डॉ. सुधाकर शेलार यांनी याच मुद्याला गांभीर्याने अधोरेखित करत एम फिल, पी एचडी च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांना देखील सजक आवाहन तर केलंच आहे परंतु मग काय करायला हवं ? या सुद्धा प्रश्नाचं उत्तर या पुस्तकातून दिलंय.
- काय आहे पुस्तकात ?
२००८ पासून संशोधक मार्गदर्शक म्हणून ७ पीएचडी आणि १२ एम फिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शेलार यांना या स्तरावर विद्यार्थी आणि मार्गदर्शनकांमधून जाणवलेली कमालीची गुणवत्ताहीनता आणि निराशा ते प्रस्तावनेतून बोलून दाखवतात. भाषेतून लिहिताना व्याकरण, निबंधाचा साचेबद्धपणा, संशोधकांकडून अपेक्षित असलेली विश्लेषणात्मक सर्जनशीलता, अभ्यासत असलेल्या विषयांच्या प्रत्येक पैलूकडे अभ्यासकांचे असलेले लक्ष, व्यक्तिसापेक्ष फक्त गोडवेच गाणारे प्रबंध या आणि अनेक सखोल मुद्यांच्या अभावांबद्दल डॉ शेलार इथे उल्लेख करतात. पुढे १३ प्रकरणांमधून साहित्य क्षेत्रातील विविध मुख्य प्रकाराच्या लिखाणाचे संशोधन आणि समीक्षा कशी असावी, त्यात कुठल्या मुद्द्यांचा समावेश असावा, दक्षता काय घ्यावी, या आणि अशा अनेक व्यापक स्तरावरील सोदाहरण स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन केले गेले आहे. "संशोधनार्थ निवडलेल्या साहित्यकृतीचे व लेखकाचे गौरवाख्यान म्हणजे संशोधन नसते, तर त्या साहित्यकृतीची त्या त्या प्रकारात यथायोग्य स्थाननिश्चिती करता यायला हवी. त्यासाठी त्या त्या साहित्यप्रकाराचा इतिहास ठाऊक असायला हवा." असं शेलार लिहितात. काव्य, चरित्र - आत्मचरित्र, कादंबरी, कथा, नाटक, व्यक्ती आणि वाङ्मय, प्राचीन साहित्य, लोकसाहित्य, विद्याक्षेत्रीय साहित्य, तत्वज्ञान, वैचारिक साहित्य या सर्व विषयांचा अभ्यास, संशोधन करत असताना त्या साहित्याचा आदर करत, साहित्यातून प्रतिबिंबित होणारे लेखक, कवीचा स्वभाव, भाव-भावना, श्रद्धाळू-अंधश्रद्धाळूपणा, प्रतिगामी-पुरोगामीत्व, परोपकारी-स्वार्थीपणा, धर्मभोळेपणा- धर्मनिरपेक्षपणा या सर्वांचा विश्लेषणात्मक अभ्यास संशोधकाने करायला हवा. हे अभ्यासताना लिखाण साहित्य म्हणून किती समृद्ध, समाजहितकारक, समाजपरिवर्तक आहे हे अभ्यासण्याचे अनेक धडे, डॉ. शेलार यांनी अगदी समर्पक शब्दसंग्रह वापरून प्रत्येक प्रकरणात मांडले आहेत. हे सर्व मांडताना लेखकाची शुद्ध मराठी प्रमाणभाषा लिहिण्याची शैली, एखादा मुद्दा समजावून सांगण्याची सहजता दिसून येते. संशोधकाचा फक्त साहित्य क्षेत्रच नाही, तर तो अभ्यासत असलेल्या विषयासंबंधात येणारा कुठलाही विषय, उदा. विज्ञान, तंत्रज्ञान, राज्यशास्त्र, लोकसंगीत, अर्थशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींची सखोल माहिती त्याला असायला हवी. हे सांगताना लेखकाने त्या त्या ठिकाणी स्वतः संबंधित विषयांचे अनेकविध पैलू, अभ्यासाचे विविध दृष्टिकोन, एवढंच नव्हे तर अभ्यासकाचा वैयक्तिक त्या विषयाकडे पाहण्याचा हेतूसुद्धा कसा असावा याचे दूरदृष्टीने सर्वसमावेशक मार्गदर्शन केले आहे. यासाठी लेखकाचा अनेकविध साहित्य क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, सखोल आणि चिकित्सात्मक अभ्यास, ज्ञान या पुस्तकातून परावर्तित होते. बऱ्याचशा इंग्रजी शब्दांना आपण रोजच्या बोलीमध्ये आदराचे स्थान दिल्याने, पुस्तकातील प्रमाणभाषा आणि त्या त्या वृत्तीला, स्वभावाला, वैशिष्ट्याला लेखकाने दिलेले शुद्ध मराठी शब्द, कला क्षेत्राव्यतिरिक्त असणाऱ्या वाचकांना जड किंवा अनाकलनीय वाटू शकतात परंतु मार्गदर्शकाच्या भमिकेतून हे अपेक्षित आणि स्वागतार्हच आहे.
साहित्याचा 'सारांश' किंवा लेखकाचेच विचार लिहीत राहणे, म्हणजे समीक्षा किंवा संशोधनपर लेख नव्हे असं लेखक या पुस्तकात सांगतात, म्हणून मी स्वतः हे लिहिताना पुस्तकातील अजून बारकाव्यांचा, मुद्यांचा उहापोह इथे करत बसत नाही. तो आपण स्ववाचनाच्या अनुभवातूनच करू मिळवू शकता. पुस्तक वाचताना हे एम फिल, पी एचडी च्या मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांसोबतच साहित्यिकांनीही साहित्याचा एक ज्ञानकोश वाटावा, असं मला वाटतं. साहित्यविषयक मार्गदर्शनाबरोबरच अनेक नवनवीन विचार, शब्द आणि नवे दृष्टिकोन हे पुस्तक शिकवतं. "विवेक बुद्धीच्या आधारे व्यक्तिगत, सामाजिक व्यवहार करणे, धर्मरूढींची चिकित्सा करून जे कालबाह्य, त्याज्य ते टाकून देऊन नविनाचा स्वीकार करणे, जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून अनुभवजन्य ज्ञानावर विश्वास ठेवणे, कर्मकांडांचे महत्व कमी करणे, इहवादाचा स्वीकार करून दैवाला, नियतीला किंवा कर्माला दोष देऊन स्वस्थ बसण्याऐवजी प्रयत्नवादाची कास धरावी." असा सुधारणावाद लेखक डॉ. सुधाकर शेलार शेवटच्या प्रकरणात सुचवतात. त्यांची ही वैश्विक, परिवर्तनवादी विचारसरणी मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाला एका नव्या उंचीवर नेऊन बसवते.
एकूणच हे पुस्तक प्रत्येक कला क्षेत्रीय विद्यार्थ्याच्या, प्राध्यापकांच्या आणि एम फिल, पी एच डी विद्यार्थी व मार्गदर्शकांच्या आणि साहित्यिकांच्या प्राधान्याने सतत संग्रही असावे. सामान्य वाचकांसाठी देखील हे पुस्तक ज्ञानवर्धक ठरेल. जेणेकरून मराठी आणि इतरही भाषासाहित्य आपला आळशीपणा झटकून नवीन सर्जनशील साहित्य आणि साहित्यिक निर्मितीची पालवी फुटण्याची अशा बाळगू शकेल.
- तुषार पोपटराव वाघमारे
अ.नगर (9273130063)
Comments
Post a Comment