Skip to main content

पिशी - भन्नाट प्रवासातील मजेदार किस्से - १

 
      नोहेंबर महिना असेल. कोरोना यायच्या आदलं वर्ष. दिवाळीची सुट्टी संपली नव्हती पण तेजस सरांचा व्हिडीओ प्रोजेक्ट सुरू करायचा होता, इलेक्शन जवळ आले होते. माऊल्या म्हणजे Ajinkya Dandawate  निवेदक आणि मी एडिटर असं सुसल्याने (आम आदमी Sushilkumar Shivaji Shelke ) आम्हाला तयार केलं होतं.  पावसाळ्याचे दिवस, त्यामुळं आमच्या सवयीप्रमाणे नगरला निघायच्या आधी आम्ही फुल तयारीत. मोबाईलला शेपरेट प्लास्टिकची पिशवी. आम्हाला कायम लागतात त्यामुळं माऊल्या ने कुठूनतरी चान्स मारून माझ्याकडं जपून ठेवल्या होत्या पावसाळ्या साठी. निघायची वेळ कोणती तर संध्याकाळी, पावसाच्या मोक्यावर. रूमवर जायचं सगळं सामान (वस्तू या अर्थाने) एका बाचक्यात भरलं, ते पण भिजनार नाही अशी सोय केलती. माऊल्या घरी माझ्यापर्यंत आला. तेवढ्यात सुसल्याचा फोन - येताना 'पिशी' घेऊन ये. म्हटलं आणतो ! पिशवी नेणं म्हणजे एवढं काय अवघड काम नाही. पण त्याची ती 'पिशी' त्याच्या घरून, शेळकवाडी वरून न्यायची होती. गाडी निघाली दैठण - मेखणी मार्गे शेळकवाडीकडं. वाघमारे वस्तीच्या माथ्यावर गेलो तं ह्ये काळंझ्यार आभाळ आत्ता कोसळंल असं भरून आलेलं दिसलं. खैदान आलं तं आम्ही उडून जाऊ असं वातावरण होतं. पण आम्ही नांगरे पाटलांचं 'हौस्लों से उडाण होती है' आठवलं. माऊल्या म्हटला "तुश्या, आपल्याला 'पिशी' धरता येईल का पण ?" म्हटलं "धरता येईल का म्हंजे ? पिशवी तं हाय, देऊ बॅगेत ठेवून !" आणि इथं उलगडा झाला तेव्हा तोंडात हाणून घेऊ का गाडीवून उडी टाकू असं झालं. सुसल्या ने सांगितलेली 'पिशी' पिशवी नव्हती तर तो 'पी.सी.' होता. सुसल्या च्या 'पिशी' वर लंय हसलो. नंतर ते वर्षभर पुरलं आम्हाला. अशे 'शेळके' जोक आमच्यात कायम होतात. हसायला दोघंच असायचो. अशा गमती लंय वेळा झालेल्या. एकदा एका सामाजिक विषयावर मीटिंग होती. मैत्रिणीने सुशीलला पत्ता सांगितला 'Rest house' ला या म्हणून. नगरच्या खाचखळग्यानी माळीवाड्याला येढा मारून झाल्यावर सुसल्याने तिला परत विचारलं, हे रेस्ट हाऊस नेमकं कुठं येतं ? 'शासकीय विश्रामगृहात' सुसल्या याआधी कितीतरी वेळा गेलेला होता. पण ही रेस्ट हाऊस ही भानगड त्याला 'शासकीय विश्रामगृह' म्हणल्याशिवाय उलगडली नव्हती. इंग्लिश मुळं घोळ झाला होता. असो. मुद्द्यावर येऊ. 

 

    
  इकडून पाऊस बघून आम्ही सुसल्याला परत फोन केला, रस्ता चांगला असेल तर आम्ही जातो तुझी 'पिशी' आणायला. तर म्हटला जा, चांगलाय. तिथं गेलो तोपर्यंत ६ वाजून गेलेले, आभाळाच्या पांघरुणानी अंधार पडला होता. सगळीकडची लाईट गेलेली. वातावरण पाहून सुशीलचे फादर आम्हाला निघू देईनात. गावाकडची वडीलधारी माणसं अनुभवाची पक्की आणि मनाने काळजीवाहू असतात. सुशीलने केलेली जोडाजोडी खोलायला त्याला ४ फोन करावे लागले. नाही हो करता करता pc भिजावा नाही म्हणून गोणीत भरला. तं ह्या गोंधळात सुशीलच्या ल्हाण्या भाचीने जे बोंब ठोकली, म्हणे ते नेऊच नका. मनातल्या मनात म्हटलं तुझ्याच मामाने सांगितलाय बाई 'पिशी' आणायला. सुशीलच्या फादरला आम्ही दैठण मध्ये जाऊन थांबतो अशी थाप मारून सुशीलच्या घरून निघालो. Pc वाली गोणी एका बाजूने टांगली, खालून गुढगाभर वरती पाणी नाही लागणार अशी. चालू PC असा खाद्याच्या गोणीत भरून लटकावलेला पाहून त्या कंपनीचा CEO 'वाट दिसू देगा देवा' चं इंग्लिश व्हर्जन बॅकग्राऊंड घेऊन भर सभेत रडला असता. नंतर व्हायचं ते होणार होतं, भले भदाडे चे भदाडे थेंब टपकायला लागले. आता ते आपल्याला मधेच टपकावणार असं खात्रीशीर वाटून गेलं. पण आम्ही नांगरे पाटलांसोबत कधीतरी बानगुडे पाटलांची सुद्धा मोटीवेशनल स्पिचे ऐकली होती. त्यामुळं आम्ही निघालो, कच्चा रस्ता वढला. मग डांबरी. दैठण मध्ये पोचूस्तोवर अंधार चांगला गडद झाला. स्टँडवर आप्पांच्या दुकानात बॅगा ठेवल्या होत्या त्या घ्यायला थांबलो तोवर पावसाने त्याची झोडपट्टी वाढवली. खैदान जास्त नव्हतं. पाऊसच बेकार कोसळत होता. शनी च्या टेकडावून वाहात आलेल्या खोंगळा खाली डांबरीला भिडल्या होत्या. आता ह्याचा कसूर थोडा कमी होऊस्तोवर थांबू म्हटलं. एवढं सगळं आवरून निघाल्यावर आता घरी जायचा कसला विचार सुद्धा आम्ही केलेला नव्हता. आपल्याला ट्रेकिंग ला गेल्यावर भिजायची सवय आणि तसलं थ्रिल अंगात आहे असा कॉन्फिडन्स होता. तिथं काही गिऱ्हाईक पण ताटकळत उभे होते. ओळखी निघाल्या. नंतर समजलं अररर आपण अजून आपल्याच गावातेत. उभ्या उभ्या जनरल पावसाच्या गप्पा झोडल्या. उन्हाळभर पाणी नाही आन् पावसाच्या तोंडाला पाटाला पाणी कशाला ** सोडत्यात का ? ही जुनी जखम एका म्हाताऱ्याने गावरान शिवी देऊन उकरून काढली. ते झाल्यावर 'तु काय करतो, हा काय करतो, कोंच्या कॉलेजला हेत, नंबर लागला का पैशे भरले, डिग्री झाल्याव काय करणार ?' अशी जनरल आमची इंटरव्ह्यू पार पडली. कधी कधी असं होतं - तेवढ्यापुरत आमच्या सारख्या बॅचलरांना पाऊस थांबत नाही याचं दुःख नव्हतं, प्रश्न कधी संपतील याची चिंता होती. खेडकर आणि रुपनर सरांनी सांगितलेलं वेगळं काहीतरी करा एवढंच डोक्यात होतं तेव्हा, पण हे लोकांना कसकाय सांगायचं. इथं एमेश्शी करतोय सांगितलं तरी "म्हंजे तु आता नेमका काय व्हशील ?" हे सांगावा लागायचं. 


        पावसाचा जोर उलसाक कमी झाला. इथून बंगाट निघालं तर बेळवंडी फाट्याच्या पुढं काय नसंन् आणि आता आभाळ बी मोकळं झालं असणार अशी डोक्यालिटी लढवली आणि निघायची तयारी केली. लोक तोंडाकडं पाहत होते, अंधार पडलाय, एवढा पाऊशे न् ही एडी सटाकनी नरगला जाणार. पण आमचा कॉन्फिडन्स अजून डाऊन झालेला नव्हता. कसा होणार ? सांगितलं ना, आम्ही मोटिव्हेटेड पीपल होतो. धर्माधिकारी सरांनी सांगितलेली 'जोनाथन लिव्हिंग्स्टन' ची कथा आम्ही दोघांनी पण मन लावून ऐकलेली होती. त्यामुळं इंद्रियांमध्ये (हात पाय वगैरे) भलतीच रग होती. 'ये तो शिर्फ शुरुवात है' आठवून हेल्मेट चढवलं. सामान लोड केलं आणि निघालो. पहिली, दुसरी, तिसरी मग चौथ्या पट्टीवर गाडी निघाली. पावसात जास्त पण फास्ट जाता येत नाही. गाडी हाकायला मी होतो. रस्त्याच्या कडेला लोकं थांबलेली होती. लंय तं लंय एखादंच रोमँटिक कपल आमच्यासारखी खा.. सॉरी हौस भागवायची म्हणून मधून हवा सुद्धा जाणार नाही इतके एकमेकांना चिटकून चालले होते. त्यांना पाहिलं की आपल्यासारख्या सिंगल्यांना कसंतरी होतं. अशे कपल दिसले की आपल्याकडचे रस्त्याच्या कडेचे लोकं लंय चेकाळतात. राजापूर फाट्याच्या वळणावून पुढं निघलो तसं बारीक सपका तोंडावर बसायला लागला.  अहीरे सरांनी वर्षभर सांगितलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यातले गार वारे तेच होते कायनू ? हेल्मेट असलं तरी मान शेकून निघायला सुरुवात झाली. बेळवंडी फाट्याच्या आशेनं सपकं सहन केलं. आत्तापर्यंत फक्त गुढग्याखाली पॅन्ट आणि वरती जर्किन भिजलं. आतले अवयव कोरडे होते. त्यामुळं अंगात ऊब होती अजून. इकडचं तिकडचं उकरून फिदीफिदी हसणं आता आम्हाला जमणार नव्हतं. त्यामुळं आमचा आमचा शेपरेट संघर्ष ऑनबोर्ड सुरू होता. गाडी देशी बेवड्यासारखी व्हलगडत होती, रुपनर सरांनी किरकोळ पोरगा पाहून त्याला गचांडावं असं. खाली सुसल्या चा 'पिशी' भिजला का काय हे डोकवायची सुद्धा सोय नव्हती. माऊल्या ने मुंडी खाली घातलेली. त्याला वाटलं होतं नेहमीप्रमाणे गाडी हाकण्यापेक्षा मागं बसणं सोपं असंल. चांगला झोडपून निघाला. आता बेलवंडी फाटा आला होता पण पाऊस कमी होण्यापेक्षा अजून बेकार खवळला होता. वारं पण थोडं वाढलं. आम्ही झोपलेल्या वाघाच्या ** नाकात काडी घातलीय आणि आता ते जीवावर बेतलंय असं फिल येत होतं. 'आपला अंदाज चुकला ना की खूप त्रास होतो' हा स्वप्नील जोशी चा डॉयलॉग आपल्यासाठीच होता असं वाटलं. माऊल्या काय विचार करीत होता माहीत नाही. पण त्याची माझ्या पेक्षा लवकर फाटते हे मला नक्की माहीत होतं. 'हे बेणं पडलं की हाये' अशी शंका यायची. तरीबी 'माघारी जाता येणार होतं' हे आम्ही दोघं विसरून गेलो होतो जवळजवळ. इथपर्यंत सुसल्याचा 'पिशी' सुरक्षित पोचला होता. आता आशा होती वाडेगव्हाण ची. तिकडं तरी पाऊस नक्की कमी झालेला असणार... 
क्रमशः...


Comments

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...