Skip to main content

प्रासंगिक - ४ शाम-ए-सुरंग है..


शाम-ए-सुरंग है.. 


    रोज एक संध्याकाळ येते तीच ती मदहोश करणारी शाम मस्तानी, लता दीदींनी बोलावलेली सांज ये गोकुळीं सावळी सावळी.. सूर्य मावळला की या सावळ्या रंगाचं सौंदर्य काय असतं हे अनुभवायला देणारी मावळतीची सर. या संध्येसोबत प्रत्येकाची एक आठवण असते, त्या आठवणीतुन गोड स्वरांनी मनात खिळलेली त्या व्यक्तीची प्रतिमा हीच त्या मावळतीच्या सरीची सावळी कविता असते..

छाया - अविनाश जाधव

      त्या व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहायला भेटणं, त्याच क्षणी ती व्यक्ती मनपटलातील एका पडद्यावर गाजवत सुखद चिमटे काढताना जर अगदी २० अंशाच्या कोनातून डोकावणारी सोनेरी किरणे असतील तर मात्र खरी सायंकाळ अनुभवली असं वाटतं. सायंकाळीच केलेला तो किशोर कुमारच्या गाण्यांसोबतचा प्रवास, मनातल्या त्या व्यक्तीबद्दलची चाकेही गरागरा फिरवत असतो. अगदीच स्पष्ट वर्णन करायचं झालं तर तिसऱ्या पहाराला हिरव्यागार डोंगरावर चरायला सोडलेल्या गावरान गाईला वेसण सोडून मोकळं सोडल्यावर ती जशी घरी बांधलेल्या वासराकडे शेपटी चा डान्स करत घरी पोचते, अगदी तशीच ओढ असते या सायंकाळी. कुणासाठी पिलांना भेटण्याची आस, कुणासाठी हळवी, कुणासाठी  घरची आठवण करून देणारी , कुणा एका प्रियकर प्रेयसीला आपल्या सोबतच्या घालवलेल्या गोड क्षणांची असेल किंवा कुणासाठी ही सावळी शाम स्मितहास्याच्या खळी पडलेल्या खड्ड्यात कोलमडून पाडणारी असते.

          कधी कधी तर या सायंकाळी काही मजनू अरिजित बाबूंची गाणी ऐकून असलेल्या/नसलेल्याही प्रमाची आठवण काढत असतात मग मित्रांकडून कधी कधी असं काही नाही म्हणत क्लीन बोल्डही होतात !! एक सायंकाळ असते छायाचित्रकाराची, रोज तशीच दिसणारी तरीही क्षितिजावर नाविन्य शोधणारी..रंगांची मुक्तहस्त उधळण करणारी..
      आमच्या अहमदनगर महाविद्यालयातलं ETI कँटीन असो किंवा विखे पाटलांचं अभियांत्रिकी महाविद्यालयाचं कँटीन असो, इथे संध्याकाळचा चहा पिण्याला सुद्धा विशेष कारणं असतात, पण जीला मर्यादा नाही ती गोष्ट चांगली कशी ? कटिंगचा चहा म्हणता म्हणता फुल मागवला तरी त्यालाही सूर्याने ओढत चालवलेल्या होस्टेलच्या काट्यांचेच वेध असतात. ज्यांना समजायचं त्यांना गुदगुल्याही झाल्या असतील, व्हायलाच पाहिजेत !!

छाया - अविनाश जाधव 

   अजून एक ताफा असतो या सायंकाळी प्रत्येक शहरात side business या नावाने प्रसिद्ध. सूर्य कलला की शाळा कॉलेज कोणत्या वेळेला सुटतात हे या ताफ्याला काट्यासाहित माहित असतं. मस्तपैकी गंदपावडर करून एक पाय गाडीच्या बंपर वरती ठेवला म्हणजे तिने smile द्यायलाच पाहिजे. शेजवार पेरलेल्या ज्वारीतून कोळपं फिरावं तशी बोटं या उभारलेल्या केसांमधून फिरतात, ते याच सायंकाळच्या वेळी. असो काळानुसार संध्या सावळीची गोरी व्हायला लागलीय.

   गावाकडची असो वा शहराकडची, प्रत्येकाची एक सायंकाळ साद घालत असते रोज एका कोपऱ्यातून.. अलगद मनाला उचलून घेते आणि त्या रंगीबेरंगी उधळलेल्या तुषारांच्या क्षितिजावर सोडून देते... कधीही थांगपत्ता न लागणाऱ्या स्वप्नांच्या लपंडावात .. प्रत्येकाच्या स्वतःच्या आगळ्या कोपऱ्यात नेऊन ठेवणारी... सायंकाळ सावळी सावळी !!



- तुषार वाघमारे, देवदैठण
९२७३१३००६३
tusharpwaghmare.blogspot.com

Comments

  1. संध्याकाळ आणि गझल हे कॉम्बिनेशन कसे सोडले तुषार राव तुम्ही ? बाकी एकदम कडक . सावळी प्रकरण जरा सिरीयस घेतलं तुम्ही त्याची भानगड काय ते कळु द्या एकदा .

    ReplyDelete
    Replies
    1. सावळी प्रकरणच दशको दशकी न संपणारं आहे, सावळ्या रंगाचं वेड कुणाला नाही बरं ?

      Delete
  2. खुपच अप्रतिम भावा सायंकाळच्या अनेक बाबींचा बारकाईने विचार करून काळजात घर करून जाईल अशा सुंदर शब्दात वर्णन केले आहे .......

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !! आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे . भेटत जावा आमच्या ब्लॉग वरती

      Delete
  3. अप्रतिम लेखन! आपल्या लेखनाचे एक नाही तर अनेक पुस्तके नक्की प्रकाशित होईल यात शंका नाही

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !! ढवळे सर, आपल्या अनमोल प्रतिक्रियेने खूप मोठी जबाबदारी टाकून दिली माझ्यावर !

      Delete
  4. खुप छान☝👍

    ReplyDelete
  5. सुरेख लेखन !!👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद !!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...