शाम-ए-सुरंग है..
रोज एक संध्याकाळ येते तीच ती मदहोश करणारी शाम मस्तानी, लता दीदींनी बोलावलेली सांज ये गोकुळीं सावळी सावळी.. सूर्य मावळला की या सावळ्या रंगाचं सौंदर्य काय असतं हे अनुभवायला देणारी मावळतीची सर. या संध्येसोबत प्रत्येकाची एक आठवण असते, त्या आठवणीतुन गोड स्वरांनी मनात खिळलेली त्या व्यक्तीची प्रतिमा हीच त्या मावळतीच्या सरीची सावळी कविता असते..
![]() |
छाया - अविनाश जाधव |
त्या व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहायला भेटणं, त्याच क्षणी ती व्यक्ती मनपटलातील एका पडद्यावर गाजवत सुखद चिमटे काढताना जर अगदी २० अंशाच्या कोनातून डोकावणारी सोनेरी किरणे असतील तर मात्र खरी सायंकाळ अनुभवली असं वाटतं. सायंकाळीच केलेला तो किशोर कुमारच्या गाण्यांसोबतचा प्रवास, मनातल्या त्या व्यक्तीबद्दलची चाकेही गरागरा फिरवत असतो. अगदीच स्पष्ट वर्णन करायचं झालं तर तिसऱ्या पहाराला हिरव्यागार डोंगरावर चरायला सोडलेल्या गावरान गाईला वेसण सोडून मोकळं सोडल्यावर ती जशी घरी बांधलेल्या वासराकडे शेपटी चा डान्स करत घरी पोचते, अगदी तशीच ओढ असते या सायंकाळी. कुणासाठी पिलांना भेटण्याची आस, कुणासाठी हळवी, कुणासाठी घरची आठवण करून देणारी , कुणा एका प्रियकर प्रेयसीला आपल्या सोबतच्या घालवलेल्या गोड क्षणांची असेल किंवा कुणासाठी ही सावळी शाम स्मितहास्याच्या खळी पडलेल्या खड्ड्यात कोलमडून पाडणारी असते.
कधी कधी तर या सायंकाळी काही मजनू अरिजित बाबूंची गाणी ऐकून असलेल्या/नसलेल्याही प्रमाची आठवण काढत असतात मग मित्रांकडून कधी कधी असं काही नाही म्हणत क्लीन बोल्डही होतात !! एक सायंकाळ असते छायाचित्रकाराची, रोज तशीच दिसणारी तरीही क्षितिजावर नाविन्य शोधणारी..रंगांची मुक्तहस्त उधळण करणारी..
आमच्या अहमदनगर महाविद्यालयातलं ETI कँटीन असो किंवा विखे पाटलांचं अभियांत्रिकी महाविद्यालयाचं कँटीन असो, इथे संध्याकाळचा चहा पिण्याला सुद्धा विशेष कारणं असतात, पण जीला मर्यादा नाही ती गोष्ट चांगली कशी ? कटिंगचा चहा म्हणता म्हणता फुल मागवला तरी त्यालाही सूर्याने ओढत चालवलेल्या होस्टेलच्या काट्यांचेच वेध असतात. ज्यांना समजायचं त्यांना गुदगुल्याही झाल्या असतील, व्हायलाच पाहिजेत !!
![]() |
छाया - अविनाश जाधव |
अजून एक ताफा असतो या सायंकाळी प्रत्येक शहरात side business या नावाने प्रसिद्ध. सूर्य कलला की शाळा कॉलेज कोणत्या वेळेला सुटतात हे या ताफ्याला काट्यासाहित माहित असतं. मस्तपैकी गंदपावडर करून एक पाय गाडीच्या बंपर वरती ठेवला म्हणजे तिने smile द्यायलाच पाहिजे. शेजवार पेरलेल्या ज्वारीतून कोळपं फिरावं तशी बोटं या उभारलेल्या केसांमधून फिरतात, ते याच सायंकाळच्या वेळी. असो काळानुसार संध्या सावळीची गोरी व्हायला लागलीय.
गावाकडची असो वा शहराकडची, प्रत्येकाची एक सायंकाळ साद घालत असते रोज एका कोपऱ्यातून.. अलगद मनाला उचलून घेते आणि त्या रंगीबेरंगी उधळलेल्या तुषारांच्या क्षितिजावर सोडून देते... कधीही थांगपत्ता न लागणाऱ्या स्वप्नांच्या लपंडावात .. प्रत्येकाच्या स्वतःच्या आगळ्या कोपऱ्यात नेऊन ठेवणारी... सायंकाळ सावळी सावळी !!
- तुषार वाघमारे, देवदैठण
९२७३१३००६३
tusharpwaghmare.blogspot.com
संध्याकाळ आणि गझल हे कॉम्बिनेशन कसे सोडले तुषार राव तुम्ही ? बाकी एकदम कडक . सावळी प्रकरण जरा सिरीयस घेतलं तुम्ही त्याची भानगड काय ते कळु द्या एकदा .
ReplyDeleteसावळी प्रकरणच दशको दशकी न संपणारं आहे, सावळ्या रंगाचं वेड कुणाला नाही बरं ?
Deleteखुपच अप्रतिम भावा सायंकाळच्या अनेक बाबींचा बारकाईने विचार करून काळजात घर करून जाईल अशा सुंदर शब्दात वर्णन केले आहे .......
ReplyDeleteधन्यवाद !! आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे . भेटत जावा आमच्या ब्लॉग वरती
Deleteअप्रतिम लेखन! आपल्या लेखनाचे एक नाही तर अनेक पुस्तके नक्की प्रकाशित होईल यात शंका नाही
ReplyDeleteधन्यवाद !! ढवळे सर, आपल्या अनमोल प्रतिक्रियेने खूप मोठी जबाबदारी टाकून दिली माझ्यावर !
Deleteखुप छान☝👍
ReplyDeleteधन्यवाद !!
Deleteसुरेख लेखन !!👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !!
Delete