जागतिक सायकल दिनानिमित्त...
माझी पहिली मैत्रीण
"कितीची हे रं गण्या सायकल ?"
"२४ ची"
"नाहीये अय, काही पण फुसक्या बाता हानतंय त्ये"
"खरंच २४ ची हे, आमछे आबा म्हणले. तुला काय माहीत रं बंट्या ?"
"पयली २२ चीच तुला मधून येत होती, ख्यळून दाखव बरं ही शिटाव बसून"
"हा मंग ? येती मला वरून, मी नाय दाखवणार चालून तुम्हाला"
असं म्हणत गण्याने सायकलच्या नळीखालून पाय घालत एक दोन अर्धवट पॅंडल मारले आणि सायकल चालती केली. रस्त्याच्या पांढऱ्या फुफाट्यात नव्या टायरची नक्षी स्पष्ट उमटवत गेलेली कोरी करकरतीत सायकल पोरं न्याहाळत उभे राहिले.
हा प्रसंग आम्ही साधारण ४ थी - ५ वी त असतानाचा. साठलेल्या पाण्याच्या डबक्यात सायकल स्टँडवरती आडवी करून फवारे उडवणे, जोरात पळवत नेत फर्रकन लांबलचक ब्रेक मारणे, दोन्ही हात सोडून सायकल पळवणे, वेगात सायकल नेऊन दोन्ही पाय कॅरेजवरती ठेवून स्टंटबाजी आणि बरेच काय काय उद्योग आमचे. वस्तीवरची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा झाली की ५ वीला गावात सायकलवर शाळेत जाणं आमचं स्वप्नं असायचं. ४ थी पर्यंत तशी धडपड करून सायकल शिकून घ्यायची घाई. ५ वी ते १० वी सायकलवरून गावच्या विद्याधाम मध्ये येणं जाणं. आप्पांचा (वडील) जन्म १९५९ सालचा अण्णांच्या (आजोबा) पाटील खानदानात झालेला. त्यांच्या जन्मा अगोदर वाघमारे वस्तीवर सायकल होती ती दामू तात्या आणि अण्णांकडेच, असं ते सांगतात. त्या काळात घरात सायकल असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. तेव्हापासून सायकलची साथ आजपर्यंत आहे. मधल्या काळात एक दोन सायकली बदलल्या असाव्यात. आता ही सायकल आहे ती मी ५ वीत असताना घेतलेली, श्यामा तात्यांकडून ५०० रुपड्यांना. त्यावर त्यांचं नाव आहे खरेदी तारखेसह (०५/०९/१९८४).
या सायकलशी माझं खूप जवळचं नातं. माझी ही पहिली मैत्रीण. आमची मैत्री आजपर्यंत आहे. ११ वी ते Bsc च्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिरूरला जाणं असलं, तरी बसच्या लहरीपणामुळे गावापर्यंत हिच्यासोबतच 'चल मेरे साथी'. दिवस उगवण्याच्या आधीच डेअरीत दुधाच्या किटल्या वाहण्यापासून ते संध्याकाळी गुरांसाठी घास, मका आणण्यापर्यंत तिचं महत्वाचं काम, त्यामुळे कुटुंबाचा महत्वाचा घटक. कधी तुटलेल्या पॅडल ने नडघ्या फुटल्या, खड्यांवरून घसरून कितीदा गुडघे, पोटऱ्या साळून घेतल्या. तिच्या खोलाखोलीचे उद्योगही घरीच. एकदा शाळेतून घरी येताना वळण आणि मोठ्या उताराचा रस्ता. गाड्यांची सारखी वर्दळ. उताराने सायकल जास्त पळावी म्हणून जोरजोरात पॅडल मारले. सायकलची बिम डगडग वाजत होती. आणि इतक्यात खटकन आवाज येत पॅडल वरून पाय घसरला, तो लॉक झाला होता. चैन पडून गुंतली होती. मी पाठीवरच्या दप्तरासह मधल्या नळीवर लटकलेलो, ब्रेक हातात सापडण्याचा कोणताच पर्याय नव्हता. उतार वाढत चालला तसा सायकल ने वेग घेतला. प्रचंड घाबरलेलो मी, गुडघाही सावरू शकलो नाही. लांबपर्यंत डाव्या पायाचा गुडघा डांबरीवर सालपटत राहिला. (त्यावेळी शाळेसाठी हाफ चड्ड्याच होत्या). पुढून मोठी गाडी वेगात आली, तर काय होणार आपलं ? वळणावर वळवताही येईना. कसाबसा पाय फरफटत ब्रेक लागला आणि जीव भांड्यात पडला. गुढगा भरपूर साळून निघाला होता. घरून सायकल देणे बंद होईल या भीतीने या सगळ्या जखमा लपवून ठेवण्याचा प्रयत्न असायचा. आजपर्यंत शेताच्या कामात, खेळताना, हिंडताना कितीदा जखमा झाल्या, खरचटलं, कापलं पण अजूनही 'फस्ट एड किट' माहीत नाही, की दवाखाण्याची मलमपट्टी !
आता मोटारसायकल असली तरी शेतातली छोटीमोठी ओझी वाहण्याची जबाबदारी हिचीच आहे. जुनं ते सोनं म्हणतात, तसं हिचं धड (बॉडी) अजूनही दणकट आहे. पूर्वी सायकल ही कुटुंबाची गरज होती, नंतरच्या काळात ती आरोग्यासाठी चांगली म्हणून शहरी लोकांची चैनीची वस्तू बनली आणि आता सायकलकडे 'काळाची गरज' म्हणून पाहण्याची वेळ आलीय.
शहरं आणि खेड्यातसुद्धा वाहनांची वाढती गर्दी, त्यातून मोठ्या प्रमाणात होणारं कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे उद्भवलेली जागतिक तापमानवाढ (अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, समुद्राच्या पाण्याची वाढती उंची, यामुळेच) या सर्वांना उत्तम उपाय आणि शाश्वत पर्याय म्हणून ई-वाहनांबरोबरच सायकलकडे आशेने पाहिलं जातंय. अनेक देशांनी सायकलच्या वापराला चालना देत सायकलसाठी प्रत्येक ठिकाणी विशेष रस्ते बनवलेत. आपल्याकडेही अशाच चळवळी उभ्या करून शहरांतर्गत कामासाठी जास्तीत जास्त सायकलच्या वापरावर भर द्यायला हवा. परिपूर्ण शारीरिक व्यायाम आणि सुदृढता देणारी सायकल चालवणं आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे पूर्वीएवढं कष्टाचं राहिलेलं नाही.
भविष्यात मित्रांसोबत सायकलवर ठिकठिकाणी भरपूर भटकणं, दैनंदिनीमध्ये, शक्य असेल तर रोजच्या कामासाठी देखील सायकल कायमची दोस्त असेल हे माझं एक स्वप्नं आहे. माझ्याही समवयस्क तरुण भारताने नवनवीन बाईक्सच्या प्रेमात पडण्यापेक्षा 'स्टायलिश सायकल' हे आपलं ड्रीम मानलं, स्वतःला सायकलिस्ट म्हणवून घेण्यात अभिमान वाटून घेतला, तर नकळतपणे आपला महाराष्ट्र आणि भारत देश पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरणारा सक्षम, निरोगी तरुणांचा देश म्हणून जगभरात आदर्श निर्माण करील.
- तुषार
#जागतिक_सायकल_दिन #सायकल #my_dream_cycle #Cycle #Cyclist #जागतिक_तापमानवाढ #YOGI #Global_Warming #Cycle_for_Nature
खूपच छान 👌👌👍👍
ReplyDeleteMast re
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान लेख.. आपल्या विचारांची सायकल अशीच चालत राहो..
ReplyDelete