आपण कुठवर पोचलो ?
पृथ्वीवर आपण किती छोटे आहोत यापेक्षा या ब्रह्मांडात आपण इवलेसे जीव सुद्धा नाहीत हे सत्य आहे. इतर प्राण्यांप्रमाणेच माणूस, फक्त त्याला बुद्धि जास्त.
त्याने हे सगळं तयार केलं या बुद्धीच्या जोरावर. बुद्धी सोडून सगळ्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये काही फरक नाही. खाणे, पिणे, पचवणे, संभोग, मुलांना जन्म देणे, म्हातारे होणे आणि मरून जाणे. प्रत्येक प्राण्याला या सर्व गोष्टी आणि सोबत भावनाही असतात. आपले जोडीदार सुद्धा ! तसे माणसांनाही आहेत. फरक इतकाच, त्याने या नात्यांना नावं दिली, आणि कोणत्या नात्यातल्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं पाहिजे हे मापदंड ठरत गेले. त्यानुसार कोणतं वागणं नैतिक आणि कोणतं अनैतिक याच्या व्याख्या बनत गेल्या आणि हे नात्याचं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनत गेलं.
पक्षी, प्राण्यांची आई पिलाला जन्म देते. त्याच्या पंखात, पायात बळ येईपर्यंत, त्याला स्वतःची अन्नाची गरज भागवता येईल, इथपर्यंत ते आपल्या जीवनाचा कितीतरी भाग खर्च करत असावेत. नंतर ते त्याला सोडून दिल्यात जमा करतात. त्यांना आपण खर्च केलेल्या कष्टाची परतफेड त्यांच्याकडून हवी नसते की उपकार केल्याचं श्रेय ! ते त्यांचा जोडीदार शोधतात आणि आपल्या जन्मदात्यांनी जे केलं तेच करतात. म्हातारपणी मरूनही जातात. त्यात जन्म दिलेल्या जीवाचा अपराधीपणा नसतो, की जन्मदात्याना त्यांचा द्वेष !
माणसांमध्येही असंच असावं काही हजारो वर्षांपूर्वी. आता त्याने भावना आणि नात्याचं क्लिष्ट जग निर्माण केलंय. त्यातून एकमेकांबद्दलच्या अपेक्षा आणि एकमेकांवरील हक्क तो गाजवू लागला. हे सगळे पाश तोडले की वरवर कळत जातं, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. जन्मदात्याकडून त्याचा जन्म, पालनपोषण आणि पोट भरण्याचं प्रशिक्षण मिळवणं हा त्याचा नैसर्गिक, प्राकृतिक हक्क आहे. नंतरच्या काळात तो पृथ्वीवरचा स्वतंत्र जीव आहे, त्यावर कुणाचा हक्क नाही. त्याला त्याच्या सर्व शारीरिक क्रिया परिस्थितीनुसार पार पाडण्याचे, जोडीदार शोधून त्याच्याशी भावनिक, शारीरिक संबंध ठेवण्याचे अधिकार निसर्गाने त्याला बहाल केलेत. त्यात तो कमजोर राहिला तर स्वतःहून मरून जाण्याचा नियमही निसर्गाचा. निमित्त म्हणून त्याच्या अन्नसाखळीतील त्याच्या भक्षकाचं ते अन्न. त्याचा भक्षक क्रूर नाही, त्याचं सुद्धा स्वतःच्या पोटासाठी केलेलं ते काम नैतिकच. यावरून स्पष्ट होतं, पोट भरलेलं असताना माणसाने आपण तयार केलेल्या मोह मायेसाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा खून करणे नैतिक नाही. त्याला जे हक्क निसर्गाने बहाल केलेत तेवढ्याच हक्कांचा तो वाली.
परंतु आपण मानवाने एकीकडे या हक्कांच्या मर्यादा पोट भरण्यापलीकडे नेऊन मोडीत काढल्या आणि दुसरीकडे स्वतंत्र जीव म्हणून जगण्याच्या अनेक मानवप्राण्यांच्या अधिकाराला आपल्या नियमांचे टाळे बसवले. त्याच्या शारीरिक क्रियांवर बंधनं आली, त्याचं जीवन खाजगी आणि सामाजिक अशा दोन भागात विभागलं गेलं.
नर आणि मादी मानवाचं संपूर्ण आयुष्य सुद्धा स्वतंत्र नसावं का ? की माणूस सर्व सजीवांसाठी असलेला 'Survival of fittest' हा सिद्धांत माणूस फक्त आपल्याच मानव जमातीसाठी लागू करून घेऊ लागलाय ? जसं की जो माणूस माणसांच्या मापदंडात बलाढ्य, बलवान, तो स्वतंत्र जगण्यास जास्त समर्थ ? आपण गुंतलोय या क्लिष्टतेत, आपणच सोयीसाठी तयार केलेल्या नात्यांमध्ये, त्यांच्या गाजवल्या जाणाऱ्या हक्कामध्ये, त्यांच्या अपेक्षांमध्ये !
आपण स्वतंत्र होऊ शकतो ?
- तुषार पोपटराव वाघमारे
(7020346820)
Comments
Post a Comment