Skip to main content

प्रासंगिक - ५ एक प्रेरणादायी आत्मचरित्र- एक खोड तीन फांद्या


एक प्रेरणादायी आत्मचरित्र - एक खोड तीन फांद्या        
अहमदनगर मध्ये एका वृत्तवाहिनीसाठी काम करत असताना एका पुस्तक प्रकाशनाला जाण्याचा योग आला. ते वाचनात आलेलं पुस्तक माझ्या दृष्टीने कसं वाटलं हे मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न..


       ‘एक खोड तीन फांद्या’ हे गुगळे परिवारातल्या श्रीमती सदाबाई हरकचंद गुगळे यांचं हे आत्मचरित्र , परंतु संपूर्ण गुगळे परिवाराचं आहे कि काय असा भास होतो . आत्तापर्यंत गुगळे परिवाराला सुखी कुटुंबाच्या रुपात अदबशीर एकत्र जोडून ठेवण्याचं काम या बाईंनी केलं, म्हणून ‘एक खोड तीन फांद्या’ हे शीर्षक समर्पक ठरतं. 


सध्याच्या मोबाइल फोन आणि सोशल मीडियाच्या जमान्यात सगळे व्यस्त असल्याने एकमेकांशी संवाद होतो तो मोबाईल वरूनच, काही माहिती, ज्ञान हवं असेल तेही गूगल आणि Youtube च्या माध्यमातून. मग अशात म्हाताऱ्या माणसाच्या बडबडीकडे कोण डोंबल्याचं लक्ष देतंय ! खरं तर खरा अनुभवाचा आणि ज्ञानाचा साठा म्हातारी माणसं आहेत, हे गुगळे परिवाराने या पुस्तकातून दाखवुन दिलं. श्रीमती गुगळेंच्या व्यक्ती म्हणून आतल्या वेगळेपणाला ओळखत त्यांच्या सुनामुलांनी म्हणजेच या खोडाला आलेल्या गोड फुलफळांनी पुढाकार घेतला हेही तितकंच कौतुकास्पद. यानंतर शब्दांकन करणाऱ्या लेखिकेचं ही या कामात मोठं योगदान दिसून येतं, कारण एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन विचार करणं, आणि ते त्या व्यक्तीच्या शैलीत लेखनरुपात उतरवणं इतकं सोपं नव्हे ! लेखिकेची आणि बाईंची एकरूपता वाचताना दिसते. म्हाताऱ्या वयातही सगळं आठवुन सांगताना सगळं घटनाक्रमाणे आठवेल, असं नाही. तरीही लेखिका प्रा. दया अतुल जेठे यांनी साधलेली कालसुसंगती, सहज जीवनक्रम नेत्रपटलांवर उभी करते. 

उजवीकडून - श्रीमती सदाबाई गुगळे 


    मुळात माझ्या भाषेत सांगायचं झालंच तर जुनी माणसं लहान मुळासारखी स्वभावाने गोड आणि मनाने सोज्वळ असतात. श्रीमती गुगळे बाईही याला अपवाद नाहीत. घरच्या कडक शिस्तीच्या वातावरणात वाढलेल्या सदाबाईंच्या स्वभावात प्रेम, समजूतदारपणा आणि तितकीच सहनशीलता आहे हे पुस्तक वाचताना क्षणोक्षणी कळतं. वडील मगनलालजी गांधींची शिस्त आणि आई केशरबाईंचा काटकसरी पणा गुगळे घराण्यात बिन्नी म्हणून कर्तव्य पार पाडायला कामी आलं. तर पावलोपावली गरिबीचा चिखल तुडवायला, रुतलेला पाय वर काढायला ज्यांना मदत केली, ते पती हरकचंदजी यांच्या प्रत्येक गुणाचं दर्शन बाईंनी या चरित्रातून घडवलंय. व्यवसाय करत असताना पतीला टोमणे मारण्याचं सोडून, लोकांच्या श्रीमंतीच्या थाटाकडे पाहून हरकचंदजींच्या मागे निष्क्रियतेच्या शिक्क्याचं घोडं मागे न लावता उलट प्रत्येक चढउतारात हरकचंदजींना मानसिक आणि वेळेला आर्थिक आधार द्यायला बाई कमी पडल्या नाहीत. 

      संसार सुरू असताना सासर आणि माहेरच्या तक्रारी, कौटुंबिक आणि वैयक्तिक राग यांचाही प्रामाणिकपणे उच्चार करायला बाई आजही कचरल्या नाहीत . हा स्पष्टवक्तेपणा हरकचंदजींकडुनच शिकला असावा असं वाटतं. आपल्या सासरची खडा न् खडा माहिती माहेरी सांगणारे, आजकालच्या मुली कुठं आणि गरिबीचे चटके लपवत माहेरी संसाराच्या फक्त सुखाच्या गोष्टी सांगणाऱ्या बाई कुठं, हा विचारच आजच्या पिढीला नवलाई ! अगदी घरातही खाण्याची परवड आली, तीही पतीला सांगून त्यांचा आत्मविश्वास अजून डळमळीत का करायचा इतका छोटा आणि समजदारीचा विचार बाई करू शकल्या. एखाद्या सिनेमाच्या कहाणीप्रमाणे गुगळे परिवाराचा संसार गरिबीतून खुलत जावा, असा हा यांचा जीवनपट वाचतानाची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. आजपर्यंतच्या प्रवासातील चूका प्रामाणिकपणे मांडत, वाचकाला औपचारिक किंवा कथात्मक वर्णन वाटावं असं जाणवत नाही. तर समोरच्या व्यक्तीला जास्त उपदेशपर तत्व सांगत न बसता आपल्याला उपयोगी पडलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट सवयीचा, आणि निर्णयांचा बाईंच्या जीवनाचा आरसा आपल्याला सर्व काही आपणहून शिकवून जातो. या पुस्तकातून आजच्या कुटुंबापासूनच वैयक्तिक पणे विभागलेल्या व्यक्तीला कुटुंबसुख काय असतं याची प्रचिती येते. 

उजवीकडून - लेखिका प्रा. दया अतुल जेठे आणि गुगळे परिवार


        अगदी स्वाभाविक दर्शन घडवणारे संवाद लेखिकेने योग्य त्या प्रमाणात मांडले आहेत. कुटुंबातून बाजूला पडल्यामुळे झालेला त्रास आपल्या मुलांना नको म्हणून बाईंनी मुलानातवंडांवर केलेले एकत्रित संस्कार आणि त्यामुळे एकत्रित बांधला गेलेल्या गुगळे परिवाराचा नक्कीच एखाद्याला हेवा वाटेल. मुलांना गरिबीची जाणीव करून देण्यापासून तर त्यांना कौटुंबिक निर्णय सर्वांना सोबत घेऊन ठरवण्याइतपत सक्षम बनवल्याचही वेगळा उल्लेख नसताना वाचकाला समजून जातं. एकत्रित असल्याचे फायदे व्यवसाय करतानाही कसे होतात ही या गुगळे दाम्पत्याची मुलांना दिलेली दुरदृष्टिता आ वासून सोडणारी होती. अगदी एखाद्या घटनेच्या खोलात जाऊन गोष्ट सांगत न बसता मुद्द्याचं लिखाण वाचायला मिळतं, आणि त्यामुळे या वाचण्यात वेळ व्यर्थ जातोय की काय असं म्हणत कंटाळा येण्याचा प्रश्न हे चरित्र वाचताना उद्भवला नाही. तर सत्यतेचा पाया पकडून उगीचच एखाद्या घटनेला कृत्रिम रंग चढवण्याचं साहसही या पुस्तकाने केलेलं नाही. आपल्या लग्नापूर्वीपासूनची प्रत्येक घटना सदबाईंच्या जीवनातील एक तत्व सांगून जाते, त्यामध्ये गरिबीच्या काळातील त्यांची सहनशीलता, कुटुंब सांभाळण्याची सचोटी, जबाबदारी निभावण्यातला प्रामाणिकपणा, मुलांवर संस्कार करत असताना पाळलेला कडकपणा, प्रत्येक वळणावर आपल्या सोबतीने करायला सांगितलेली आणि बाईंनी अजूनपर्यंत निभावलेली नागेशाची निस्सीम भक्ती, पत्नी म्हणून पतीसोबत केलेला संघर्ष, व्यक्ती म्हणून समाजाची केलेली सेवा, गरिबीच्या वेळी लाजू नये आणि श्रीमंतीच्या काळात माजू नये हे जीवनात बनवलेलं तत्व, व्यवहारातील काटेकोरपणा आणि हे सर्व पाहताना वैयक्तिक आरोग्य सांभाळत एकत्र कुटुंब निर्माण करण्याचा कडेला नेलेला निर्धार या सर्वाचं प्रतिबिंब या आत्मचरित्रातून होतं. 



      आजही आपण केलेल्या चूक मान्य करत हवं तिथे बदलत्या काळानुसार बदलायला शिका असा संदेश नकळत सदाबाई आपल्या आत्मचरित्रातून देतात. यासंदर्भात एका प्रसंगाचा उल्लेख करत दुसऱ्या समाजाच्या मुलीसोबत आपल्या नातवाच्या लग्नाला केलेला अट्टहासाचा विरोध कसा कुटुंबात तणाव निर्माण करून गेला याबद्दल आणि आपल्याच हट्टापायी सुनेची बाळांतपणात झालेली हाल यांचा पश्चाताप करताना बाई स्वतःला दोष देतात परंतु कठोर निर्णयानंतर झालेल्या तणावातूनही गुगळे परिवार कसा एकसंध राहतो . हा गुगळे परिवाराच्या संस्कारांचा आदर्श हे पुस्तक वाचकांसमोर ठेऊन जातो. व्यवसायातील संपर्कात असलेल्या नोकरापासून ते व्यापाऱ्यांपर्यंतच्या जोडलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमधून या परिवाराच्या यशाचं मूळ दिसून येतं. तर स्नेहालयच्या गिरीश कुलकर्णीना सुद्धा आपल्या कुटुंबाचा भाग बनवत समाजासाठी केलेलं आणि करत असलेलं प्रत्येक काम या कुटुंबाची माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करतं. याचा कुठलाही अभिमान हे कुटुंब बाळगत नाही, याचा उल्लेखही चरित्रामध्ये आढळणार नाही हेच त्यांचं मोठेपण! आजच्या पिढीतील विभक्त कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या आणि तरीही अशांततेने ग्रासलेल्या प्रत्येकाने वाचावे असे हे आत्मचरित्र आहे . 

एक प्रेरणादायी आत्मचरित्र – ‘एक खोड तीन फांद्या’ https://metronews.co.in/all/ek-khod-tin-fandya-biography-published/


तुषार वाघमारे, देवदैठण

Comments

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...