पिचकारी - एक कोपरा संस्कृती
अहमदनगरची ख्याती तशी लांबलांब पर्यंत. अण्णांपासून पोपटराव पवारांच्या हिवरे बाजार ते थेट शिर्डीच्या शाहीबाबांपर्यंत ! शिक्षणानिमित्त एक दोन वर्षेच झाली नगरमध्ये राहून, तरी नगरचं अंतरबाह्य रूप समजायला वेळ लागला नाही. त्यातलाच एक नगरचा अंतर्गत मामला म्हणजे नगरचं 120×300 मावा उत्पादन ! गावाकडे असेपर्यंत शेतमालावर पडणारा "रोगट मावा"च फक्त परिचित होता.
पोलीस खातं आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांच्या कारवाईच्या चढाओढीत माव्याचा गुळणा जरा जास्तच वाढत चाललाय. शेजारी जिल्ह्यांमध्ये देखील नगरमधून याची मोठी निर्यात होते असं ऐकून आहे. ठिकठिकाणी पानटपऱ्यांवर विशिष्ट खाचे असलेल्या टायरवरती पीठ मळल्यासारखं माव्याचे लोट रगडणारे, खांद्यापर्यंत केस वाढवलेले हनिसिंगभक्त तरुण आपलं शक्तिप्रदर्शन करताना आढळतात. पूर्वी पान खाणारे आणि मुके असे दोन जमातीचे मानव प्राणी समोरच्या व्यक्तीशी बोलू शकत नव्हते, त्यांच्यामध्ये भर आली या मावाळ प्राण्यांची. एकदा सहज नगरच्या माणिक चौकातील एका मोबाईल दुकानात मोबाईलच्या किमतीची चौकशी करावी म्हणून गेलो, काऊंटर वरती पन्नाशिक वर्षाचा वयस्कर माणूस. गालफुगी झाल्यागत त्याने माझ्या तोंडाकडे पाहिलं. हातानेच मला इशारा केला काय पाहिजे म्हणून. मी मोबाईल आणि त्याचा तपशील सांगितला तसा म्हाताऱ्याने क्यालक्युलेटर वर किंमत टाइप केली, आणि स्क्रीन माझ्याकडे फिरवली. असला रुबाबी तत्परपणा पाहून मी निघालो खरा पण मी दुकानाबाहेर पडायला फिरल्यावर समजलं हे म्हातारं बोलू पण शकत होतं. एकवेळ बोलण्याची तक्रार समजून घेतली ओ, पण या व्यसनांचे साईड इफेक्ट्स थोडेथोडके नाहीत. त्यातलाच गहन विषय म्हणजे पिचकारी.
महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारी कार्यालयात जा, कार्यालयातील कोपरे पाहा. ते फेसबुक वर पोरं लिव्हतेत त्या "राडा" या शब्दाचा अर्थ काय असू शकतो हे कळून जाईल. कधी कधी वाटतं सां.बा. विभागाच्या वतीने झाडांचे बुंधे रंगवायला विटकरी रंगाचा काऊ वापरतात त्याऐवजी मावा शौकिनांची एक बैठक जरी त्या झाडाखाली बसवली तरी झाडाचं पूर्ण खोडंच विटकरी व्हायला काय टाइम लागतोय ! बरं, प्रत्येक कामात जसा कलाकारीपणा महत्वाचा असतो तसं, पिचकारी मारायला सुद्धा कलाकारी लागते बरं का. कधी दोन दातांच्या फटींमधून, तोंडावरच व्हिक्टरी करत, ह्ये लांबची लांब चिळकांड्या मारण्याची एक कलाच म्हणायचं नाही का ? मग काहींना त्याची इतकी सवय झालेली असते, तोंडात थुंकण्याजोगं काही नसेल तरी तोंडावर व्हिक्टरी करत आपल्या मौल्यवान थुंकीने रस्त्याला अभिषेक घातल्याशिवाय चैन पडत नाही. संपलेल्या दंतमंजन (आपली कोलगेट) ट्यूबमधून रगडून एक दिवसाचं चालू काम करायला केलेला चंबू म्हणजे टेधी उंगली से तंबाखू थुंकून टाकण्याच्या प्राथमिक प्रशिक्षणाचा एक भागच असतो.
शहरातल्या रस्त्यांवरून चालता चालता पुढचा प्राणी कधी विडा आणि पिचकारीचा अभिषेक आपल्या चरणांवर घालू शकतो, याचा अंदाज मात्र आजकालच्या हवामान विभागाच्या शक्यतेसारखा झालाय. वरतून "ओ sorry बरं का, पाह्यलच नाय" ही औपचारिकता पूर्ण करण्याइतपत आमचे नागरिक सुज्ञ आहेत बरं का. बऱ्याचदा चालता चालता क्षणार्धात आलेली ही पिचकारी आपत्ती टाळण्यासाठी लहानपणी बहिणींसोबत खेळलेल्या टिपऱ्यांचा अनियोजित उड्या मारायला फायदा हातो. आणि त्ये कोपऱ्यात देवांचे फोटू वगैरे चिकटवून तुम्ही कशाला येडेपणा करता ? आमचे थुंकायचे वांदे ! पिचकाऱ्या मारण्याच्या कसरतीत प्रवास करताना खरा कस लागतो. आपण नेमकं कोणत्या बाजूला थुंकल्यावर पिचकारी मागेच जाईल, तोंडावर उलटा फवारा येणार नाही, नेमकं मोटारसायकलवरून कोणत्या बाजूला वाऱ्याची दिशा आहे त्या बाजूला पालथं पडून, धोरणात थुंकायला सुद्धा डोकं लागतं अव. तसं नाही झालं तर तुम्ही मालकाची कोरी करकरीत कार विटकरी रंगाचा स्प्रे मारून रंगवून टाकू शकता. चांगलंच आठवतंय, चुलत्यांकडे टाटा एसी (छोटा हात्ती) होता त्यावेळी ठेवलेल्या ड्रायवरला या पिचकार्यांच्या प्रराक्रमामुळेच निवृत्ती भेटली होती.
![]() |
नगरमधील चांदबीबी महालावरचा एक कोपरा |
हे पिचकाऱ्या मारणे येड्या गबाळ्याचे काम नव्हे बिट्या. पंधराफेक चुना फसलेल्या "नवीन प्रशासकीय इमारतीच्या" थोडं खिडक्यांच्या बाजूला ढुंकून पाहा. तुम्हाला प्रशासकीय/सनदी अधिकाऱ्यांची गुटखाळ रंगरंगोटी हमखास दिसेल. नाहीतरी मावा, गुटखा त्यात भर म्हणजे चेविंग गम (चिंगम) तोंडात असला म्हणजे कसं रवंथ करणारा रॉयल हिरो दिसतो. कसंय स्वच्छ भारत अभियानाच्या नादी लागून कचराकुंडी नाहीतर थुंकीदान वापरायचं ज्ञान शाळकरी Nss, स्काऊट गाईड चे मुलं शिकवत असतात. पण एवढा नेम कुणाला आहे ? कोपऱ्यात ठेवलेल्या कचराकुंडी, थुंकीदाना शेजारी जाऊन थुंकायचं म्हणजे किती Odd वाटतं नाही का. एखाद्या कोपऱ्यात, झाडाझुडुपांच्या बुंध्याला सेकंदाच्या आत पटकन पिचकारी मारली म्हणजे कुणी बघत नाही, परिणामी आपल्या व्यक्तिमत्वावर डाग पडत नाहीत.
पुण्यातल्या सुपीक डोक्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या पाट्यांवर जो टोमणेखोरपणा (जो आत्ता तुम्ही वाचताय) आहे तो शिक्षेच्या कृतीतही उतरवला. एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर थुंकताना पाहिलं की त्याला त्याची थुंकी साफ करायला लावण्याची नामी शक्कल पुणे महानगरपालिकेने लढवली. ती कितपत प्रभावी ठरतेय याकडे आपल्या आक्रमक मीडियाचं लक्ष असेलच. दरम्यान मंत्री संत्री, आमदार, खासदार, स्वच्छतेचे ब्रँड अँबेसिडर यांच्या फोटोसेशनिक स्वच्छता अभियानावर टोमणे मारण्यातच आम्ही सोशल मीडियावर लेखक झालो. प्रातिनिधिक तत्वावर लोकांना प्रोत्साहन,चालना म्हणून ते फोटोसेशन असतं वगैरे वगैरे कागदोपत्री योजना आम्हांस ठाऊक नाहीत !! जसं चालता चालता रस्त्यात आपला एक पाय वरती करून आपल्या हद्दीची निशाणी करत चालणे कुत्र्याचं कर्तव्य आहे, अगदी तसंच देशाचा कोपरा न् कोपरा गुटखळ पिचकार्यांनी रंगवणे हेही माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही !! हागणदारी मुक्त गावं झाली असतील तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानामार्फत पिचकारी मुक्त शहरे झाली तर आजार जरा कमी होतील अशी भोळी भाबडी आशा.
समस्त पिचकारी कलाकारांना समर्पित ...
तुषार वाघमारे, देवदैठण
९२७३१३००६३
tusharwaghmare441@gmail.com
Comments
Post a Comment