Skip to main content

संवाद कुठे आहे ??

      संवाद कुठे आहे ??


       आज आपण गावाकडच्या एका खास गोष्टीवरती बैठक घेणार आहोत. बैठकीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला ऐकून, जाणून ज्ञात असतील. विचारांची बैठक, एखाद्या समितीची बैठक, कुणाला भाऊ कदमच्या कॉमेडीतील बसण्याची बैठक, तर कुणाला कुठली बैठक आठवेल सांगता येत नाही. असो, आपण गावाकडच्या बैठकीवरच चर्चा करणार आहोत. 

पारावर बसलेली बैठक
फोटो सौजन्य - Google


           गावकडच्या चौकातल्या, पारावरच्या, देवळाच्या कट्ट्यावरच्या बैठकीला काही खास विषय असा लागत नाही. आता आपण पूर्वीपासून आजपर्यंतच्या बैठकींबद्दल विस्ताराने पाहुयात.. म्हणजे कसं, पूर्वी मोबाईल वगैरे नव्हते, मग मोबाईल नसल्यावरच तोंड चालू होतं हे आपल्याला ठाऊक आहे. आता संवाद म्हणजे कसा असायला पाहिजे याचं हुबेहूब उदाहरण तुम्हाला गावच्या म्हाताऱ्या बैठकीत पाहायला मिळेल. लगेच त्यासाठी “प्रभावी संवादाचे 10 महत्वाचे मुद्दे’’ म्हणून गुगळेंना (आपलं गूगल) विचारण्याची गरज नाही ! 
   काय व्हायचं, पूर्वी गाव जरी मोठं असलं तरी तेही तुटक तुटक घरांनी, वाड्यावस्त्यांनी बनलेलं असायचं, बनलेली आहेत. गाड्यांची सोय नसायची, सायकल एखाद्या दोन प्रतिष्ठित घरी असायची. गावातल्या ‘दूदडेरि’ला दूध घालायचं म्हटलं तर सकाळी पहाटेच उठून सहा पर्यंत गडी चालत किंवा सायकल वरून किटल्या अडकवून गावात हजर होत होता. दूध घातलं की आपली पायजमा टोपी सावरत, धोतर असेल तर धोतर सावरत म्हातारं फेटा आवळून काठी टेकवत टेकवत मंदिरात, देवाचं नाद नसेल तर इष्टी स्टँडवर टापा झोडायला जायचं. हे आमक्या बनकरानी बैलजोडी आणली, तमक्या वाघमाऱ्याची गाय येली इथपासून तर थेट माध्या लोखंड्याची सून माहेराला गेली,  अजून का आली नाही, इतकी ग्लोबल आपुलकी चार सहा म्हाताऱ्यांच्या बैठकीत असायची ! मंदिराशेजारी बैठक असेल नाहीतर चौकातल्या पारावर, राम राम ठोकून माउली माउली करत बैठकीत एक एक सदस्य वाढत जाईल तशी रंगत येत जायची. बैठकीत वर उल्लेख केल्याप्रमाणे कुणी काय पेरलं, कोणत्या मालाला कधी आंबवनी दिलं, आमक्याच्या पोरीला कुठले पाहुणे आले होते ते तमक्या भावकीला किती दिवस सुतक आहे, या सगळ्याचा समावेश होत पावसापाण्यावर, सरकारच्या फसवेगिरीवर रगडून चर्चा होत असे. एखादं रंगेल म्हातारं असेल तर पायलीभर शिव्या आसडून समोरच्याला तुझंच खरं म्हणेपर्यंत माघार घेत नसे. काही मंडळींना राजकीय रसदार घडामोडी अजून साखर टाकून सांगता यायच्या, मग मला राजकारणातल्या किती खोल आणि आतल्या गोष्टी माहिती, याची समोरच्या व्यक्तीला प्रचिती आली, हे कळेपर्यंत दोन्ही बाजूने राजपुरान सुरूच राहायचं. 


         आता बायकाही बैठकीच्या बाबतीत कमी नव्हत्या आणि नाहीत सुद्धा, फक्त काहींना माहित नसेल, आपण गप्पा झोडतोय मग याला ‘बैठक’ अशी गोड संकल्पना आहे ! तर नाकात नथनी, नऊवारी लुगडं, कपाळावर भल्या मोठ्या गोंदनावर मेण लावून त्यावर रगडून बसवलेलं कुंकू आणि डोक्यावरून ओढून घेतलेला पदर सावरत रानात जाताना म्हणा, खुरपणी, लागवड चालू असताना म्हणा, अशी live बैठक महिला मंडळाची चालू असायची. कधी काम नसेल शेतात तर घरी काही दाळ दळण्याच्या हेतूने, धान्य, स्वयंपाकाचं काही निवडायच्या निमित्ताने बसलेली छोटेखानी बैठक चांगलीच रंगायची. यात अधून मधून फुरस्या सापासारखी होणारी धुसफूस मी लहान असतांना बऱ्याचदा ऐकली, अजूनही कधीतरी ऐकायला मिळते, पण फक्त म्हाताऱ्यांच्या बैठकीतच. एखाद्याचे कान फुंकल्यासारख्या बोलण्यातून एकमेकींच्या सासू सुनांबद्दलची गोपनीय माहिती रॉ एजन्टसारख्या गुप्तहेरालाही कळणार नाही इतक्या चलाखीने एकमेकींना सांगण्यात त्या पटाईत होत्या. म्हातारी जास्तच खडूस असेल तर त्यात मीठ मिरचीची फोडणी देऊन माहिती ‘चुगल्या’ नावाच्या तथाकथित कोड भाषेत एकमेकींपर्यंत या बैठकीच्या माध्यमातून कळवली जायची. अजूनही आमच्याकडे काही म्हाताऱ्या बिनपगारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसारखी कामगिरी बजावतात. त्यांच्या मार्फत कोणत्या घरात काय शिजतंय याचा पूरेपूर अंदाज लावणं सोपं जातं. महिला मंडळ कालच काल्याचं कीर्तन ऐकून आलं असेल तर मग या चर्चा बाजूला ठेऊन देवाधर्माच्या चमत्कारांची चर्चा, देव किती श्रेष्ठ आहे यावर चर्चा सुरु होते. यातून त्यांच्या निस्सीम देवावरच्या श्रद्धेचं दर्शन घडतं. 

फोटो सौजन्य - Google

          गावाकडे अजूनही उन्हाळ्याच्या उकाड्यात झाडाखाली बसणारी बैठक पाहायला मिळते. पोहायचं झाल्यावर दुपारच्या कडक उन्हात आंब्याखाली पाड पडण्याची आशा आणि आंब्याची दाट सावली या दोन्हीमुळे सदस्य संख्या आणि वयोगटही वेगवेगळा असतो.  आम्ही लहान असतांना चिंचेच्या, लिंबाच्या सावलीला आपापल्या वडिलांसोबत सगळे एकत्र यायचो.  यालाच मोठ्या बैठकीचं स्वरूप तयार व्हायचं. कुणी औत हाकून तर कुणी रात्रीच्या भरण्याने थकलेलं असेल तर बिनधास्त खेटरं उषाला ठेऊन सावलीत गाढ झोप यायची. आम्ही चिलिपिली बसल्या बसल्या गोट्या खेळ, सरमाडाच्या ताटात निघणाऱ्या कापसा सारख्या गोल कांडीची बैलगाडी, शेतीची अवजारे (कुळव, बळीराम, पाभार, ई.) यांच्या प्रतिकृती बनवून त्यांच्याशी खेळत बसायचं. तर कधी एखाद्या तात्याच्या घरी सुतार बैलगाडी, जु वगैरे बनवायला आलेला असायचा तिथेच बैठक बसायची. मग त्या सुताराच्या रंध्याकडे, छंणीकडे, गिरमिटकडे कुतूहलाने पाहत बसायचो. रात्रीची तरुण पोरांची बैठक असेल, त्यात एखाद्या पट्ठ्याला भुताखेतांच्या गोष्टी, घटना रंगून सांगायची चांगली कला असायची. या गोष्टी सुरु असताना एखादं लहान मुलगा या गप्पा ऐकत असेल तर तो झोपेत बावचळुन उठणं हमखास म्हणायचं, त्यात ते लेकरू दिवसभर जास्तच दमलेलं असेल, तर मात्र सकाळी सकाळी आईला आधी गोधडी वाळू घालायला लागायची. जसजशी दिवाळी सरून थंडी वाढत जाई, तरुणांसोबतच सर्वच वयोगटातले लोक शेकोटी पेटवून एकत्र आळं करून गप्पा मारत सकाळ संध्याकाळी बराच वेळ बसलेले असायचे. एखादा नवीन मेंबर येताना दिसला तर त्याला शेकोटीत टाकायला सासू (म्हणजेच जळणासाठी पाचरट, ताटं, इत्यादी) आण म्हणून कुणी हटकलं नाही तर नवलंच ! दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणवायला लागली की चोरट्यांचा अफवा सुरु असायच्या. अशा काळात शेकोटी पेटवून मध्यरात्रीपर्यंत ठराविक माणसं, पोरं शेजारी भले मोठे फोक घेऊन बसायचे. अनेकदा अश्याच अफवा सुटल्यावर डोंगराडोंगराने चोरट्यांमागे दगड हातात घेऊन पळल्याचे प्रसंग चांगले आठवताहेत. 

फोटो सौजन्य - Google


           या बैठकींचे फायदे म्हणावे तर सर्वजण एकत्र येणं आणि एकमेकांशी गप्पा मारत (टिंगलटवाळीच्या भाषेत का होईना) इकडच्या तिकडच्या आणि सोबतच एकमेकांची ख्याली खुशाली कळवण्याचं माध्यम होतं, आणि नकळत हेच कारण म्हणावं कि काय या मनमोकळ्या संवादानं सध्या डोकं वर काढलेल्या नैराश्य, डिप्रेशन यांचं औषधालाही नाव सापडत नव्हतं. 


         बैठक सुरु असताना एखाद्याचं पोतं उचलण्याचं, किंवा इतर छोटं मोठं काम असेल ते चारचौघांच्या हातभाराने मजेत आणि लवकर होऊन जायचं, त्यात कुणाचा इगो वगैरेचा भाग अस्तित्वात नव्हताच !! किंवा सावडही नव्हती, हा माझ्या कमी आला मग मी याला मदत करणार. एकमेकांवर प्रेमळ टोमनी मात्र ऐकायला या बैठकांमधून मनोरंजक असायची. कुणालाही टोचून बोलणं काय असतं हे ठाऊक नव्हतं, राग यायचा प्रश्नच उरत नव्हता. 

सौजन्य - Google


             गावाकडे अजूनही अशा बैठकीवाली फेटा, धोतर, पायजमा, गांधीटोपीची पिढी पारावर, जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात साऊंड बॉक्सवर किंवा मोबाईल मध्ये लावलेलं इंदूरीकरांचं कीर्तन ऐकत बसलेली दिसते. तर कुणी आपल्याही मयतीला लोक वेळ काढून येतील या भाबड्या आशेवर काठी टेकवत एखाद्याच्या दहावा, मयतीच्या निमित्ताने भेटतात. प्रौढ आपल्या धावपळीत व्यस्त तर तरुणही मोबाईल च्या निमित्ताने digital बैठक मांडून बसलेले आढळतात. 


        आमच्या वस्तीनेही एकत्र येऊन बसण्याची परंपरा अजून टिकून ठेवलीय, या बैठकीला वेळ, काळ आणि ठिकाणाची गरज नसते. सकाळी कामं आटोपून, दुपारी काम नसेल, किंवा संध्याकाळी जेवणाआधी, जेवणानंतर अजूनही आठ दहा लोक एकत्र येऊन बसतात. काळानुसार कामाचा भार वाढत गेल्याने बरेच लोक दिवसभराच्या कामाने थकल्यावर संध्याकाळी जेवण करून tv समोर देवादिकांच्या मालिका पाहण्यातच धन्यता मानतात. आमच्या घराच्या ओट्यावर ओसरीवरही वडिलांसोबत गप्पा मारत एक सहा सात जणांची बैठक तयार होते.
    
  1. छाया - राहुल गायकवाड

         आम्ही तरुणही पहिले बटनांचे आणि आता टच स्क्रीन मोबाईल घेऊन एकत्र बसतो. कधी कधी बैठकीला दोन ग्रुप पडल्यासारखे वाटतात, एकाच ठिकाणी मोबाईल घेऊन आम्हा तरुणांचा तर तिथेच गप्पा मारणारा वडीलधाऱ्यांचा एक चमू. संवाद होतो, तो मोजकाच.. नजरेला नजर भिडवायला लागली की मोबाईलचा मेसेज वाजतो. चर्चा होते, पण संवाद होत नाही. आता तर आम्हा तरुणांची चर्चा social मीडियावर आधारित, तर प्रौढ, म्हातारे आमच्या वडीलधाऱ्या पुरुष ,महिला मंडळाची बैठकीतील चर्चा देखील मोबाइल किंवा tv वरच्या तत्सम मालिकेविषयीच रमते. एकमेकांची नकळत होणारी विचारपूस कमी होत चाललीय, मनमोकळेपणाने होणारा संवाद गावाकडे सुद्धा हरवत चाललाय. 

         सणासाठी एकत्र येणारे लोक सण समारंभ सुद्धा आपल्या प्रतिष्ठेला शोभेल त्या पद्धतीने स्वतंत्र साजरा करू लागलेत. तर राजकारणातील अपवित्रतेमुळे गटबाजी वाढून माणुसकी हरवत चालल्याची खंत अबालवृद्ध बोलून दाखवतात. खऱ्या संवादाची व्याख्या हरवून गेल्यामुळे गावपण बदलत चाललंय, माणूसही नैराश्यात आरोग्यासह, स्वभावानेसुद्धा ढासळत चाललाय !!

saptarangtushar.blogspot.in

- तुषार पोपटराव वाघमारे, देवदैठण
९२७३१३००६३

tusharwaghmare441@gmail.com


Comments

  1. तुषा लेका लै भारी हाय हे . लै लवकर संपवलं राव ....

    ReplyDelete
    Replies
    1. गोडधोड जास्त खाऊ नये माणसाने 😀

      Delete
  2. तुषार खुप सुंदर लिहिलय!!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !! 😊 खूप खूप आभारी आहे.. असच भेट देत राहा.

      Delete
  3. कृपया आपली प्रतिक्रिया नोंदवताना प्रथम नाव जरूर लिहा, कुणाची प्रतिक्रिया आहे हे माझ्यापर्यंत पोहोचेल 😊

    ReplyDelete
  4. Nice Tushar👌👌

    ReplyDelete
  5. खूपच छान तुषार ....

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद !!

      Delete
  6. Santosh doke
    Khup chan Tushar

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! संतोष 😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...