लालटेन आणि चिमणी
बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!
आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभवायची असेल तर तुम्हाला हि सडक तुमच्याकडे मोटारसायकल असेल तर 2-3 मिनिटांत इथे आणून सोडते. हनुमान मंदिराच्या होळीच्या माथ्यावरून 180 अंशात नजर फिरवली तर हिरवागार शिवार कुशीत घेतो. पण त्याच्याच मागे पसरलेल्या कदमाच्या डोंगरावरून ते मुसळ्याच्या डोंगरपर्यंत गोल फिरलात तर विजेच्या खांबांची माळ नजर पुरेल तिथपर्यंत नेते ती थेट पूर्वेला साईकृपा कारखान्याच्या चिमणी वरती जाऊन आदळते तर पश्चिमेला शिरूरच्या घोडनदी पर्यंत. हा विजेच्या खांबांचा गुंता आता वाढत चाललाय. एकेकाळी एक खांब नसणाऱ्या वस्तीला आता 100 एच पी ट्रान्सफॉर्मर (डीपी) 35-40 घरांसाठी पुरत नाही. साधारण 2000 सालच्या काही वर्षे आधी महावितरण ची वस्तीवर कृपा झाली. तोपर्यंत वस्ती आणि आसपासच्या काही वाड्या वस्त्याही अंधारातच होत्या. तरीही एक विजेपेक्षाही भरवश्याचं साधन होत ते कंदील आणि चिमणी...
कंदील
अंधाऱ्या रात्री एक दिवाच जग उजळून टाकतो इतक्या छान तत्वावर वीज येण्याअगोदर च जगणं होतं. अगदी इतिहासातच जायचं म्हटलं वीज अस्तित्वातच नव्हती तेव्हाही गावं अशीच दिसत असतील. छानश्या टेकडीवरून मिणमिणत्या एक दोन दिवट्या किंवा एक एक मैलावर अंधारात सुंदर नक्षी काढणाऱ्या मशाली (टेंभे). लख्ख प्रकाशात मन जरी प्रसन्न राहत असल तरी हेच मन मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात, मधूनच भडकणाऱ्या, चिनपाट म्हणवल्या जाणाऱ्या चिमणी च्या उजेडात निरव शांततेत कधी समोरच्या व्यक्तीसमोर मोकळं होतं हे अनुभवायला गावाकडचं जीवन जगावं लागतं. एखाद्या लेखकाला त्या रात्रीच्या वेळी टेकडीवरचा गार वारा आणि अमावस्येच्या काळोखात एक मिणमिणत्या दिव्याच्या शीतल प्रकाशात बसवलं तर त्याची लेखणी जे सौंदर्य आणि शांतता कागदावर उतरवेल ती जगातील उत्तम शांततेची अनुभिती असेल. म्हणूनच कि काय पूर्वीची लोकं एवढी शांत आणि प्रेमळ होती. वीज आल्यानंतरही वीज जोडणी नसल्यामुळं माझंही सुरुवातीचं आयुष्य या कंदील आणि चिमणीच्या लालभडक प्रकाशातच गेलं.
आज गावकडकच्या फरशीने सजवलेल्या ओट्यावर गप्पा रंगल्या तरी समजदारीच्या गप्पांच्या मधलं अंतर घालवण्यासाठी नजर शेजारी गोठ्यातल्या त्या अडगळीच्या कोपऱ्यात जाते. लटकावलेला कंदील हळुवार पणे आलेल्या वाऱ्याच्या झुळुकीत काळाच्या कचाट्यात सापडल्यानं भंगारवल्याची वाट पाहत हेलकावे घेत असतो. काच नसूनही त्याला वाऱ्यानं भडकून विझण्याची भीती नसते, ना भीती घासलेट संपन्याची. तीच नजर त्याला दुर्लक्षित करत दावणीसमोरच्या दिवळीत जाते त्या वात नसलेल्या चिमणीकडे. चिनपाट जमा चिमणी देऊन तेवढंच भंगार वाल्याकडून पोरासोरांना फुगा घेता येईल हि म्हाताऱ्या आजीची भाबडी आशा. हि कंदिलाची काच घरातला पसारा आवरताना का होईना पण हाती लागते, वर्तमानपत्राच्या रद्दीत गुंडाळून ठेवलेली, फुटू नये म्हणून. अनेक आठवणी जाग्या करून देते ती काच..
रंगाच्या छोट्या डब्यापासून बनवलेली छोटी चिमणी
असे हे चिमणी आणि कंदील घरोघरी नव्या आणि भिन्न आठवणी ठेऊन काळाच्या ओघात कायमचा भडकला. होता वीज आल्यानंतरही काही घरांमध्ये, आपत्कालीन परिस्थितीत कामी येण्याजोगा, परंतु घासलेट ओतण्यापासूनच्या झंझटीमुळे सोयीस्कर असलेल्या मेणबत्तीने कंडीलाचा मान हिरावून घेतला. रात्रीच्या वेळी रानात विहिरीवर मोटार सुरु करायला जाण्यासाठी बॅटरी नव्हत्या तेव्हा कंदिलच सोबती होता. वरच्या बाजूला असणाऱ्या छिद्रांमुळे तोही मध्येच विझायचा. तेव्हा उगीच भोळा प्रश्न असायचा ते छिद्र कंदील बनवणाऱ्याने कशाला ठेवले असतील उगीच !! या प्रश्नाची निर्वात पोकळी विज्ञान विषय आल्यावर दूर झाली, त्या मेणबत्ती आणि पालथ्या ग्लासच्या प्रयोगाने. कंदिलाच्या काचेबद्दलही विशेष अशा आठवणी आहेत, कारण कंदिलाचा भडकने हाच काही संवेदनशील मुद्दा नव्हता तर काच हा एक नाजूक आणि कळीचा भाग. रात्रभर पाजळलेला कंदीलही बिना मेन्टेनन्स कधी चालला नाही. त्याला रोज रोज घासलेट आणि काच पुसणे हे दोन उद्योग करणं भागच होतं. त्या काचेत राख टाकून आतून लागलेली काजळी पुसताना अनेकदा मनगट चिरलेलं आठवतं. अशी नाजूक कामं आई आप्पा किंवा बहिणींकडून करून घ्यायची. नंतर यायला लागलं मलाही म्हणा. कधी कधी या कंदिलाच्या भडक्याने काळ्या झालेल्या काचेला पटकन बाजूला काढण्यासाठी गरम काचेवरच पाणी ओतून थंड करण्याची युक्तीही सुचलेली. पण पाणी टाकताच जेव्हा काचेचा झालेला भुगा पाहून सगळे आ वासून कंदीलाआधी आपल्याकडेच पाहतात, तेव्हा मात्र नेमका राजाश्रय कुणाकडे शोधायचा याबद्दल नाचक्की व्हायची. अजूनही वीज आल्यानंतर या काचेचं करायचं काय तर मी शोध लावलेले, ती काच देव्हाऱ्यात दिवा विझू नये म्हणून त्याच्या भोवती ठेवणे.
जाऊयात कंदिलाच्या रचनेच्या विविधतेकडे. काही साधारण तर काही चंचूपात्रासारखे वरती निमुळते होत जाणारे कंदील होते. धाकट्या चुलत्यांनी रात्री बाहेर पडण्यासाठी घरीच कंदील बनवला होता. दोन तीन रंगाचे डबे आडवे आणि उभे लावून त्याला वातीसाठी गाडीच्या ट्युबचा वॉल बसवून तो बॅटरी सारखा कंदील त्यांनी छान डोकं लावून बनवला होता. वॉल आणि हिंगोळाच्या डब्याच्या साहाय्याने चिमणी बनवण्याची पद्धत सर्वज्ञात होती. त्याला विशेष अशी वात नव्हती. सुती कपड्याची किंवा सुतोळीची वात कंदील आणि चिमणीला असे. कंदिलाची रॉकेलची टाकी गळायला लागली की डांबराचा शोध सुरु होई. अनेकवेळा नवीनच झालेल्या डांबरी सडकेच्या कडेला ओघळलेलं थोडं डांबर आणून तेच वितळवून लावलं जायचं.
अशी ही लालटेन आख्यायिका सांगताना आजच्या पांढर्याशुभ्र विजेपेक्षा कंदील आणि चिमणीच्या उजेडात मन जास्त एकाग्र राहतं हे अधोरेखित करणं महत्वाचं. अजूनही आहे हा कंदिल गावाकडच्या घरांमध्ये अडगळीच्या खोलीत धूळ खात पडलेला परंतु तो त्या घरांतून थेट भंगारामध्ये गेलाय जी घरं छप्परापासून ते तिसर्या टप्प्यातिल म्हणजेच बंगल्याचं रूप धारण करतायेत. परत तेच वाक्य म्हणणं इथं औपचारिक आहे, काळानुसार प्रत्येकाला बदलावं लागतं. पण फक्त बदलताना माणसांच्या जगण्यासाठी बदल व्हावेत, विज्ञान विज्ञान करत निसर्गाला तुडवत बदलासाठी माणसाचं जगणं नसावं. कारण हेच की प्रत्येक पिढीला बदल पाहायला मिळतात पण आमच्या पिढीला अख्खा गावाकडचा माणूस माणूसपण सोडून जाताना पाहावं लागतंय, हीच एक खंत. गावाकडची जुनी एक एक गोष्ट माणुसकीची आणि निसर्गमैत्रीची साद घालताना अनुभवायला मिळालेली आमची पिढी भाग्यवान आहे हेच प्रत्येक लेखात वाचायला मिळेल. या कंदील आणि चिमणी इतिहासजमा होताना त्यांचेही ऋण व्यक्त करावेसे वाटतात, दिवा किंवा मेणबत्ती लावून नव्हे तर त्यांनाच जाता जाता एकदा प्रकाशमान करून...
इति कंदील पुराणंम् ..
पुन्हा भेटूया लवकरच.. तोपर्यंत गावाकडे जाऊन या. गावपण अनुभवा !!
या पूर्वीचे आणि येणारे लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या माझ्या ब्लॉगला खालील लिंक वरती क्लिक करून
tusharpwaghmare.blogspot.com
आपल्या प्रतिक्रिया आणि सुचनांचं स्वागत आहे.
© तुषार वाघमारे, देवदैठण (९२७३१३००६३)
tusharwaghmare441@gmail.com
Nice 👌👌
ReplyDeleteधन्यवाद !!
Deleteअसंच भेट देत राहा !
अप्रतिम लेखन!
ReplyDeleteधन्यवाद !!
Deleteभेट देत राहा blog ला 😊