सपार
अशा या खेड्याकडच्या गावरान संकल्पनांवर नजर टाकताना आपण मागील लेखात "आरण आणि भिताड" यांचं स्मरण केलं. यावेळी अशाच गावठी स्थापत्यशात्राशी निगडीत एका सुंदर घराच्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचं शुद्ध मराठीत नाव "छप्पराचं घर किंवा झोपडी." आताही गावाकडे सिमेंटरचित घरं आली तरी काही प्रमाणात स्वयंपाकासाठी म्हणा किंवा अडगळीची खोली म्हणा, झोपड्या आपल्या इतिहासजमा होण्याच्या शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळतात. असं देखणं छप्पर बनवणं म्हणजे जिओग्राफी चॅनलच्या एखाद्या कार्यक्रमात जंगलात बनवलेलं कोपटं बनवण्याइतकं सोपं नव्हे. त्यासाठी खांबासारखी रोवायला लागणारी 'मेड'(मेढ) , त्यावर आडवे-उभे टाकले जाणारे 'वासे' आणि 'आडवळे' म्हणून लागणारी योग्य ती सरळ, मजबूत, टिकाऊ लाकडं शोधणं, गोळा करणं म्हणजे भर उन्हात घामाघूम होण्याइतकं छान. माझे वडील एकटे हे सर्व रानातून बैलगाडीत टाकून घरी आणायचे. सर्वप्रथम आपल्या सोयीच्या आखणीप्रमाणे काही अंतरांवर वरच्या टोकावर गलोलीसारखी दोन फनगडं असणारी 'मेड' साधारण हाताच्या कोपर्याइतका खड्डा घेऊन रोवली की छप्पराचे कॉलम उभे राहिले म्हणायचं. सगळं छप्पर पेलण्याचं काम मेडीचं, म्हणून त्यासाठी साधारण आंबटओलं लिंबाचं लाकूड मजबूतता आणि टिकाऊपणाचं विश्वासक. मेडीसाठी पहारीने खड्डा खोदण्याचं काम वडिलांनी केलं की आम्हा लहानांची कामं त्यातली माती जेसीबीच्या बकेटसारखे चिमूकले हात खालून पटपट उपसणे. कधी बोटं लालबुंद व्हायची पण माती उकरणं काही सोडायचं नाही. या खड्ड्यांमधे मेडी मुरूम चेळून घट्ट बसल्या की त्यावरच्या फणगडांवर आडवे, सरळ असे मजबूत भेंडीच्या लाकडाचे "आडवळे" विराजमान करून छप्पराची मजबूत ठेवण तयार व्हायची. मधे उंच व दोन्ही बाजूंना ओझरता छप्पराचा मजबूत सापळा तयार होण्यासाठी दोन्ही ओझरत्या बाजूंवर आडवळ्यांवर पूर्ण छप्परभर एकमेकांना समांतर असे "वासे" खिळे किंवा तारेच्या साहाय्याने ठोकले जातात. हे वासे सहसा बाभळीचे किंवा लिंबाचेच, दंडाइतके जाड आणि गोल असतात. छातीच्या बरगड्यांसारखं या वास्यांचं काम. आडवे -उभे वासे ठोकून झाल्यानंतर त्यावर कडूलिंबाच्या किंवा इतर छोट्यामोठ्या फांद्या टाकल्या की, छप्परावरचा बहुतांश भाग झाकला जाई. त्यावर तुरीचे तुर्हाटे, उसाचे पाचट आणि मिळेल तसे नारळाच्या फांद्या टाकून छप्पराचा जाड थर बनतो. हे मायेचं छप्पर "शेकरणं" म्हणजे "सपराच्या" घराचा अखेरचा टप्पा. "शेकरणं" म्हणजे छप्परावर पाचटाचा जाड थर अंथरूण आडव्या (अंगठ्यापेक्षा थोड्या जाड) निर्गुडीच्या लाकडांनी गादी शिवतात तसे छप्पर आतून ओढून बांधणे होय. या निर्गुडीच्या किंवा इतर झाडाच्या सरळ लाकडांना "बंधाट्या" म्हणतात. छप्पर पावसाळ्यात गळू नये म्हणून शेकरण्याच्या वेळी पाचटामधे प्लास्टिकचा किलोवर घेतलेला कागद अंथरावा लागे. वरून बंधाट्या आडव्या बांधण्यासाठी जाड छप्पराला आतून गाठी कशा मारणार ? तर यासाठी "सुळ्या" वापरतात. सुळ्या एक लोखंडी रचना असलेली हाताएवढी सुई. हा सुळ्या वरून वडिलांनी बंधाट्यात ओवून द्यायचा आणि मी तो आतून कशावरतरी उभा राहून लाकडाच्या टिपर्यात ओवून परत मागे ओढायला सांगणार. अशा प्रकारे प्रत्येक बंधाटीला काही टाके पडले की छप्पर पॅक !!
![]() |
असं हे छानसं "सपार" सजवल्यांनंतर त्यात राहणे अजून गंमतशीर. चला या काही गंमती तुम्हाला सांगतो. मी पाचवीला-सहावीला असेपर्यंत आम्ही "सपरा"तच राहायचो. कडेने दगडाच्या सारवलेल्या भिंती. वरून एखाद्या राहिलेल्या कानोशातून स्वच्छ सूर्यप्रकाश चुलीवरती सोनेरी किरणांनी पडायचा. शेजारीच आईने आणलेलं काटेरी सरपण. या छप्परात 1 BHK सारखं किचन, बेड, हॉल तसं काही नसतं बरं ! सगळं घर एकच, हेच याचं सौंदर्य. मोरी !! म्हणजे आपलं "बाथरूम" हो, ती बाहेरच उभ्या तुर्हाट्या, गोणपाटांनी झाकून चौकोनी आकाराची तयार व्हायची. आता त्या काळातील शौचालयाची सोय विचारू नका म्हणजे झालं ! असो. या छप्परात राहायची खरी कसरत पावसाळ्यात. छप्पर नवीन शेकरलेलं असलं तेवढ्यापुरतं ठीक, नंतर हळूहळू छप्पराला गळती लागल्यावर कुठे कुठे घमेले आणि बादली ठेवू, हे सांगायला एकजण आणि ठेवायला मीच असायचो. कधी जळणाचं सरपण ओलं झालं की आईची रसोई धुरात चूल फुंकून फुंकूनच अर्धवट शिजायची. त्यात परवरावर ओलं असल्यावर तर मग झोपायची सोय झालीच म्हणा. कधीतरी आमच्या वस्तीवर नारायण बाबांच्या खात्यात सिमेंटची घरं बांधली. मग किमान जास्तच पाऊस झाला की त्यांच्या ओसरीत सर्वांची राहायची सोय होई. आता पत्र्याच्या किंवा स्लॅबच्या घरात जशी उन्हाळ्यात गर्मीने लाही लाही होते, तशी छप्परामधे काळजी नाही. थंडगार छप्परात उन्हाळा जाणवत नसे. छप्पराचं दार लाकडाच्या कवाडांचं (दरवाजे) बनलेलं. कवाडांना बिजागिर्या (ज्याभोवती दार फिरते) एकमेकांत अडकवण्याच्या होत्या. दाराची कडी वरती चौकटीच्या गोल कोंड्यात अडकवून मग कुलूप लावणे. या दाराच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आत्ता हास्यस्पद परंतु तेव्हाच्या भयानकच. मला घरात झोपवून बाहेरून कुलूप लावून आई-वडील रानात, बहिणी शाळेत जात. मग जेव्हा जाग येई, स्वप्नातच बावचळून उठल्यासारखं त्या अंधारात चाचपटत मी ठणाठण बोंबा ठोकत दारात उभा. कधी कधी अशा वेळी माझे धाकटे चुलते आबांनी मला कवाडाच्या फटींतून हात घालून एखादं कवाड उचलून मला बाहेर काढलेलं चांगलं आठवतं. सपरातील अशा आणि इतर रंजक किस्स्यांमधे माझं बालपण अगदी नैसर्गिक, सुसंस्कारी आणि रमनीय असं गेलं. ही "सपार" बनवण्याच्या किंवा पावसाळ्यात शेकरण्याच्या कलेने पारंगत माझ्या वडीलांसोबत आजही मी गोठ्यासारखी छप्परं बनवायला मदत करतो. फरक एवढाच, पूर्वी फक्त मेढीसाठी खणलेले खड्डे जेसीबीच्या मुठेने उपसायचो आता छप्परावर जाऊन वासे ठोकण्याची कामं करायला शिकलो.
नकळत स्वत:चं घर बांधताना त्या कष्टामधेच आपण रोवलेल्या मेढरूपी आठवणीं बजबूत होऊन बसत. आता काही कुणी घर बांधताना विटा रचायला मदत करत असेल मला नाही वाटत. या घरांना घरपण देण्याचं काम काही चिमण्यांसारखे पक्षीही करत. सपरांमधे केलेल्या त्यांच्या घरट्यांना कसलंही आधुनिकतेचं गालबोट नव्हतं. असं हे "सपार" माझ्या आज्या - पज्यांसोबत बदलाच्या ओघात हळूहळू जिर्ण झालं.
चला तर पुढच्या लेखात भेटूया गावाकडच्या नवीन एका सुंदर गावराण संकल्पनेसह..हा आणि इतर लेख वाचण्यासाठी खालील वेबसाईटला नक्की भेट द्या. आपल्या सुचना आणि प्रतिक्रिया खालील मेलवर स्वागत आहे.
---- तुषार पोपटराव वाघमारे, देवदैठण
(९२७३१३००६३)
- tusharwaghmare441@gmail.com
- tusharpwaghmare.blogspot.in
Comments
Post a Comment