परिस्थिती जगायला शिकवते या एका सुंदर आणि नैसर्गिक वाक्याप्रमाणे मी घडत आलो. अशाच परिस्थितीकडून शिकण्याच्या वर्गात अर्थात माझे वडीलही बसले. या वर्गात शिकताना त्यांच्याकडे विविध अनेक कला अंगीकृत आहेत. कला म्हटलं की ती कला माणसाला आर्थिकदृष्ट्या सबल बनवीलच असं काही नाही परंतु एक व्यक्तिमत्वासहीत समाजातलं विशेष स्थान आणि पोट भरण्यापुरतं सामर्थ्य कलाच देते.
असो. अशीच एक जुन्या लोकांची कला म्हणजे दगड किंवा घडवलेल्या तोडींची भिंत रचण्याची कला. प्रश्न पडणं सहाजिक आहे, गवंडी का नाही म्हटलं ? गवंडी ही आपण व्यावसायिक संकल्पना म्हणू शकतो ,ज्यामधे तो विविध उपकरणे, साहित्य वापरतो. इकडे दगडांपासून भिंत रचणे म्हणजे कसलंही साधन नाही. फक्त बलशाली हात आणि दगड पुरेसे. पूर्वी घर खणाचं (मोठमोठ्या लाकडांचं छत) असो किंवा छप्पराचं, दोन्हींकडे दगडाच्या भिंती बांधल्या जायच्या. त्यावर पांढर्या मातीने लिंपून सारवणं व्हायचं.आईने आतून पांढर्या मातीनं प्लास्टरसारखं सारवलं की मऊशार भिंत दिसायची. या सारवणावर जमिन सारवतात तसं काही दिवसांच्या कालावधीने मातीचे पोपडे निघल्यावर पांढर्या मातीच्याच पाण्यानं सारवावं लागायचं त्याला "पोचारा" देणं म्हणतात. जर भिंत दगडाची नसेल तर काही भिंतींसाठी पांढर्या मातीचे भेंडेही वापरले जात. हे भेंडे मोठ्या चौकोनी बॉक्सएवढे असायचे. या भिंती बांधताना भिंत काटकोणात सरळ उभी बनावी यासाठी आधुनिक वापरला जाणारा वळंबा किंवा गुण्या वगैरे काही सोय नव्हती. दोन दगड किंवा दोन थरांमधे सपाट थर देणारं वाळू सिंमेंटचं मिश्रणसुद्धा नाही. फटिंमधे छोटेमोठे दगड टिपर्या यांचंच काम प्रत्येक थराला आधार देणं. पावसाळ्यात जुणं किंवा कच्चं दगडाच्या भिंतीचं बांधकाम ठासळायचं.
पूर्वीची घरं सर्रास या पद्धतीत व्हायची त्यामुळं कित्येक जणांना "भिताड रचणे" चांगलं जमायचं. ती पिढी म्हणजे माझ्या आजोबांची पिढी. वडिलांच्या पिढीमधेही काहींना जमतं, त्यातलेच आमचे पिताश्री. अशा प्रकारची मजबूत "भिताडं" रचणं त्यांना अजूनही गवंडी कारागिराइतकंच छान जमतं. वस्तीवरची बरीचशी भावकीतील मंडळी आपुलकीनं त्यांच्याकडून गरजेला दगडाचं भिताड बांधून घेतात. सध्या घर किंवा गोठा कुणी अशा बांधकामात करत नाही परंतु अजूनही गावाकडे कांदा साठवणूकीसाठी "आरण" वापरतात. आरण म्हणजे काही एखादं पात्र नव्हे, त्यात कांदा ओतून ठेवणे. अशाच दगडाच्या आयताकार रचलेल्या चार भिंतींमधे धान्य (साधारण कांदाच)साठवलं आणि वरून उसाचं पाचरट अथवा बाजरीचं वाळलेलं सरमाड वगैरे टाकलं म्हणजे त्याला "आरण" म्हणतात. आधीच लावणी, खुरपणी, काढणी, काटणी आणि दोन ते तीन ठिकाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेत सहा सात वेळा हाताळलेला प्रत्येक कांदा या आरणीत हवेशीर राहतो. ही आरण लावण्यामागे शेतकर्याची भली मोठी आशा असते. उन पाऊस आणि वार्यापासून या आरणीचं अर्थात कांद्याचं सरंक्षण जिकीरीचं. दोन दगडांच्या फटींमधून कांद्याला पुरेशी हवा मिळेलच असं नाही. एखादा कांदा सडला की हळूहळू सगळी आरण खराब करतो. अशात ही आरण प्रथमत: रचणे म्हणजे काही एका शिकलेल्या इंजिनीअरचं काम नाही. इथं मोजमाप नाही, गुण्या- वळंबा नाही की कॉंक्रिट नाही किंवा जमिनीचा सपाटी तुकडाही असेल तर कवचितच. दगडांना एकमेकांना आधार देत उभं करायचं, सोबतच कांदे आतल्या फटी भरून काढतात. बर्याच आरणी वारा, पाऊस झाल्यानंतर ढासळतात. हा झाला आरणीचा धडाचा आणि दगडी रचनेचा भाग. आरणीच्या वरच्या बाजूने वरती सांगितल्याप्रमाणे पाचट किंवा सरमाड वगैरे पालापाचोळा टाकावा लागतो. पावसात कांदा भिजू नये म्हणून आरण छप्परासारखी "शेकरावी" लागते. हे "शेकरणं" म्हणजे काय हे सविस्तर आपण येत्या लेखात पाहू. सध्या शेकरणं म्हणजे पावसाचं पाणी आरणीत जाऊ नये म्हणून वरून बनवलेलं आवरण एवढं ठिक. अशा या आरणीची आणि दगडाच्या भिताडाची अख्यायिका शेवटाला येताना त्यांचा वापर किंवा माझ्या पिताश्रींसारख्या कारागीरांच्या कमतरतेमुळे म्हणा, कांदा किंवा धान्य साठवणूकीला आरणींची रचना, पद्धत काळानुरूप बदलत चाललीय हेही सांगणं तितकच महत्वाचं आहे. आताही त्यांना आरणच म्हणतात परंतु त्या तुरीच्या तुर्हाट्यांच्या, नवनवीन उपलब्ध लोखंडी जाळ्यावगैरेंनी सुलभ केलेल्या असतात. पत्र्याचं शेडही भरपूर वापरतात. गावागावानुसार आरण या नावातही फरक किंवा बदल होत असावा. काळानुसार बदलण्याच्या ध्यासामधे मीही कदाचित सहभागी असल्यामुळं मी काही आरण रचण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या वडिलांची ही दगडाचं भिताड रचण्याची शेवटची पिढी म्हटलं तरी काही गैर नाही. आतातर गवंडीही आपल्याकडचे बोलवले जात नाहीत. चारदोन बिहारी आणले की ते एक-दोन दिवसात पूर्ण घरच बांधून टाकतात. जुनं मोडल्याशिवाय नव्याचा शोध लागत नाही ते यालाच म्हणत असावं.
अशाच गावाकडच्या काही जुन्या संकल्पना, कला, पद्धतींसह भेटू पुढच्या लेखात.
- वाघमारे तुषार पोपटराव
(९२७३१३००६३)
tusharwaghmare441@gmail.com
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2080188855557097&id=100006980074613¬if_t=feedback_reaction_generic¬if_id=1525957220762907&ref=m_notif
- वाघमारे तुषार पोपटराव
(९२७३१३००६३)
tusharwaghmare441@gmail.com
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2080188855557097&id=100006980074613¬if_t=feedback_reaction_generic¬if_id=1525957220762907&ref=m_notif
Comments
Post a Comment