Skip to main content

विज्ञान साहित्य - १ इस्रोचा ब्रह्मांडविस्तार

             ..इस्रोचा ब्रम्हांडविस्तार..

       २० आणि २१ व्या शतकात भारताने जगाबरोबर विशेष वैज्ञानिक प्रगतीचा वेग साधला. याच काळात आपल्या सजीवपणाच्या असण्यापलीकडच्या कितीतरी विशाल अज्ञात गोष्टी विज्ञानयुगात माणसाला ज्ञात झाल्या. आपल्या अस्तित्वाबद्दलचे अनेक गुढ उकलणे विज्ञानाने शक्य झाले.या गोष्टी जरी कल्पनाविवश होऊन समजून घ्यावा लागत असल्या तरी भारतीय इतिहासाला या गोष्टी नवीन नाहीत.खूप वर्षांपूर्वी ऋषि, वेद ,पुराणांमधे या काल्पनिक ब्रम्हांडांचा उल्लेख आढळतो. फरक इतकाच की ते फक्त लेखन आणि कल्पनेपर्यंतच मर्यादित राहिलं विज्ञानयुगात मनुष्य सदेह अनुभवतोय अवकाशात प्रत्यक्ष झेप घेऊन ! डार्विनच्या सिद्धांतानुसार सजीवांना जगण्यासाठी स्वत:ला काळानुरूप बदलून अस्तित्व टिकवावं लागतं. मग जेव्हा स्टीफन हॉकिंगसारखे तत्वद्वेत्ते १०० वर्षात माणसाला पृथ्वी सोडावी लागण्याची धास्ती घालतात, ती काही कुणा नेत्याच्या आश्वासनासम नव्हे ! तर जगाचं पाऊलच सध्या त्याच दिशेने वेगाने पडतंय. अशा भयाण भवितव्याला तोंड देण्यासाठी विज्ञान आणि संशोधन हेच अस्र वापरावं लागतं. तोही मग शोधतोय आपलं नवीन घरटं या विशाल महाकाय ब्रम्हांडामधे ! त्याच दिशेने धावणारा एक चमकता तारा म्हणजे भारतीय अंतराळ समशोधन संस्था' अर्थात् इस्रो ! जगाबरोबर फक्त शोधमोहिम किंवा अंतराळ मोहिमच नव्हे तर सकल मनुष्याची सद्यस्थितीतील सुरक्षितता कुठेही हलू न देता भविष्याचा डाव आखणारी ही संस्था. 

             १५ ऑगस्ट १९६९ साली डॉ. विक्रम साराभाईंच्या पुढाकाराने अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या (NASA) "सिनकाम -३" या उपग्रहाच्या कामगिरीने प्रेरित इस्रोने अगदी कमी कालावधीत आपलं सामर्थ्य वसुंधरेपार नेलं. अंतराळ संस्थची पहिली यशस्वी जनक रशिया, चंद्रावर पहिला मनुष्य पाठवणारी अमेरिका आणि कृत्रिम उपग्रह प्रक्षेपणांच्या तगड्या स्पर्धेत  असणारी युरोपीय स्पेस एजन्सी, या आणि इतर जागतिक ठसा उमटवलेल्या संस्थांमधे इस्रोने आपली मान उंचावत गेल्या १० वर्षात सोडण्यात आलेल्या उपग्रहांपैकी ३८% उपग्रहांवर आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा शिक्का उमटवला आहे. जिथे नासाला ५ प्रयत्न, तिथे भारतीय इस्रोने आपल्या प्रचंड प्रतिभेने अगदी कमी अर्थभांडवलातून पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार पाडत जगाचं मन जिंकलं आणि जगाला आपल्या स्वयंपूर्णतेची बहुआयामिकता, भारतीय शास्रज्ञांच्या प्रगल्भतेची चुणूक दाखवून दिली. अगदी काही दशकांमध्ये इस्रोने एंट्रिक्स कार्पोरेशन नामक आपल्या व्यापारी महामंडळामार्फत अंतराळ क्षेत्रातील व्यवसायात जगाचा विश्वास संपादित करून आजतागायत २५ देशांचे सुमारे २७८ उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रस्थापित केले. नुकतंच १२ जानेवारी २०१८ रोजी इस्रोने आपल्या उपग्रह यादीचं शतक पूर्ण करतानाच सोबत ३० उपग्रह प्रक्षेपणाचा अजून एक विश्वविक्रम गाजवला. स्वदेशी बनावटीच्या "कार्टोसॅट-२" या जीपीएस(GPS) प्रणाली असणार्या उपग्रहाचं प्रक्षेपण यावेळी झालं. ५०० किमी अंतरावरून सीमाभागातील शत्रूसैन्यावर कडी नजर ठेवण्याचं काम आणि "नाविक" या जीपीएस प्रणालीला सशक्त बनवण्याचं काम करणार असल्याने इस्रोच्या आधी ८ वर्षे अंतराळ क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या दहशतवादसमर्थक पाकिस्तानने धास्ती घेतली आहे. आतंकवादाविरूद्धच्या जागतिक लढ्यामधे इस्रोने अशा मोहिमांद्वारे मोलाचा वाटा उचलला आहे. 

        १९६९ पासून अंतराळ क्षेत्रात झोकून घेतलेल्या इस्रोने परमाणू विभागामार्फत डॉ. साराभाई आणि डॉ. रामनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतरिक्ष अनुसंधान राष्ट्रीय समितीची (INCOSPAR) स्थापना केली आणि थुंबा, तिरूअनंतपुरम् येथे भूमध्यरेषीय रॉकेट प्रमोचन केंद्र अर्थात "टर्ल्स" चं कार्य सुरू झालं. या शास्रज्ञ, समाजअभ्यासक, अर्थविश्लेषक, व्यावसायिक सल्लागार, कामगार ,इत्यादी वर्गाने जोमाने कामाला लागून एकामागून एक यशस्वी उपग्रह आणि विविध अंतरिक्ष यानांची मालिका सुरू केली. १९७५-७६ या वर्षामधे विश्वातील सर्वात मोठं समाजशास्रीय परिक्षण "अनुद्शात्मक टेलिव्हिजन परिक्षण" म्हणजेच "SITE" पार पाडलं. याचा लाभ २४०० गावातील सुमारे २ लाख लोकांना झाला. त्याचबरोबर ५०,००० हून अधिक विज्ञानप्राध्यापक, शिक्षकवर्ग प्रशिक्षित झाले. असंच एका मोठ्या मोहिमेचं श्रेय इस्रोने मिळवलं. ते १९७७-१९७९ या वर्षात जर्मन सीमफोनी उपग्रहाद्वारे 'उपग्रह दूरसंचार परिक्षण परियोजना'(STEP) आणि भारतीय डाक व तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या मोहिमेद्वारे,८०व्या दशतात आपली कामगिरी उंचावत इस्रोने 'APPLE', 'INSAT', 'GSAT' च्या उपग्रहमालिकांनी देशातील भू-प्रणालीवर आधारित विशेष कार्य केलं.स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक क्षेत्रात भारत वेग घेत असताना एकीकडे समाजाचं जीवनमान उंचावण्याची आव्हानं, देशचं उत्पन्न आणि लोकशाही वाढीस लागून प्रगतीला धावतंपाऊल घ्यायला लावणं या दशकात महत्वाचं होतं.तरूणांना हवं होतं आधुनिकतेचं पाठबळ ! हे पाठबळ पुरवण्याचा मोलाचा कार्यभार इस्रोने उचलला. इंटरनेट संबंदीत दळणवळणाची, संवादाची उपकरणे, हवामान विभागासाठी अविष्यातील आणि वर्तमानातील माहिती विश्लेषण करून देशातील कृषी व इतर क्षेत्रांमधील अवगत प्रगती साधण्यासाठी ९० व्या दशकातील 'IRS'  आणि 'INSAT' उपग्रह मालिकेने इस्रोला भरघोस यश मिळवून दिलं. देशातील युवक युवतींना आपल्या बुद्धीमत्तेला हक्काचं व्यासपीठ आणि स्शोधक वृत्ती वाढीस लागून गुणवत्तला योग्य मार्गी लावण्यासाठी इस्रोने आपल्या स्थापना वर्षाच्या पुढच्याच वर्षी १९७० ला "RESPOND" या उपक्रमाची सुरूवात करून भारतीय विद्यार्थ्यांना अंतरिक्ष विज्ञान, अंतरिक्ष प्रौद्योगिकी आणि अंतरिक्ष अनुप्रयोगांवर अनुसंधान अविष्काराच्या संशोधनपर कार्यक्रमांसाठी आर्थिक सहाय्यता देणं सुरू केलं.
     




 
        आजतागायत इस्रोने आपल्या उठावदार कारकिर्दीत विवध संचार उपग्रह, भू-प्रक्षेपण उपग्रह, परिक्षणात्मक उपग्रह, दिशादर्शक उपग्रह, अतिसुक्ष्म उपग्रह आणि इतर प्रयोगात्मक, विद्यार्थांचे उपग्रह  इस्रोने प्रस्थापित केले. या उपग्रहांचा आकडा आणि आर्थिक अहवाल पाहता नक्कीच जगाच्या तुलनेत भारत तंत्रज्ञानाने पुढारलेला आढळतो. ४७ वर्षांच्या कारकिर्दीत २५ अतिसुक्ष्मउपग्रहांसोबत ९२ अंतराळमोहिमा, ६४ प्रक्षेपण मोहिमा व ९ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांचं प्रक्षेपण इस्रोने केलं. ही प्रक्षेपणं PSLV आणि GSLV तसेच "प्रज्ञापी" म्हणजेच "Sounding Rockets" या प्रक्षेपक यानांद्वारे पार पाडली. यशस्वी उपग्रहांच्या यादीमध्ये ९ IRS (पृथ्वी निरीक्षण आणि दळणवळण), १९ INSAT मालिकेतील (हवामान,पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन), १६ GSAT प्रणालीचे, ८ IRNSS मालिकेचे दिशादर्शक उपग्रह, ८ कार्टोसॅट (CARTOSAT), ४ SHROS, २ RS मालिकेतील, २ INS आणि इतर "आर्यभट्ट", " भास्कर", "मंगळयान", " चंद्रयान-१" असा मोहिमांसारख्या २४ अंतराळ मोहिमा, या आणि अशा ९२+ अंतराळ मोहिमा इस्रोने यशस्वी केल्या.  छप्परवजा शेडपासून सुरूवात झालेल्या इस्रोने आपलं कार्यक्षेत्र देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यातील २१ आर्थिकदृष्ट्या ,भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या शहरांमध्ये विस्तारलंय. ज्यामधे संशोधन, व्यापारी, प्रयोगशाळा, नियंत्रण केंद्रे, प्रक्षेपण केंद्रांचा        समावेश होतो.
       
        आपल्या या रूबाबदार व उठावदार कामाची छाप इस्रो जगावर यापुढेही सोडत राहिल यात शंका नाही. या विजयपर्व कालखंडातच इस्रोसारख्या प्रतिभाशाली संस्थेची भविष्यकालीन दूरदृष्टीसुद्धा तितकीच किर्तीवंत असणार यात कुणीही इस्रोचा हात धरू शकणार नाही. १२ तारखेच्या विश्वविक्रमानंतर पुढील मोहिमांचे वेध घेऊन जोमाने कामाला लागलीय इत्रोची टीम. येत्या मार्च २०१८ पर्यंत 'चंद्रयान-२' मोहिमेचं प्रक्षेपण होणं अपेक्षित आहे. यानंतर इस्रोची नजर असेल त्या सतेज सूर्याकडे. "आदित्य" या अंतराळ उपक्रमांतर्गत 'आदित्य -१' हे इस्रोचं यान/उपग्रह सूर्याच्या INFRARED Region म्हणजेच इन्फ्रारेड भागापर्यंत जाऊन सूर्याविषयीचा विशेष अभ्यास करील. DRDO म्हणजेच "रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन" व देशातील इतर वैज्ञानिक संस्थांच्या सहयोगाने इस्रो काही समनुष्य मोहिमा पार पाडेल. त्याचबरोबर AVATAR मोहिमेनंतर उपग्रहांची मालिका सुरू ठेवून "GSAT-1A" , "RISAT -1A" याचं प्रक्षेपण करील. अमेरिकेच्या NASA (नासा) बरोबर रिमोट सेंसिग तंत्रज्ञानामध्ये "NISAR" या उपग्रह प्रणालीवर काम करील.
      
      "असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी आहे." या गरजेच्या भविष्याचा वेध घेत इस्रो आपली अबूतपूर्व प्रगती अधिक वेगवान आणि नवचैतन्याने सहजपणे जगासमोर ठेवून अगदी थोड्या कालखंडात अवघ्या ब्रम्हांडाच्या कानाकोपर्यात पोहोचेल याची खात्री इस्रोचं कार्य पाहता कुणीही सहजपणे देईल. आणि भारत राष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या हितासाठी पुढे सरसावेल. यासाठी हवंय या तेजाला साथ कर्तुत्ववान तरूणांची, त्यांच्या चिकित्सक ,संशोधक, निष्ठावंत कामगिरीची. तेव्हा इस्रोचा आदर्श घेत भारतीय युवक युवतींनी देशांतर्गत क्षुल्लक, सामाजिक, धार्मिक, राजकिय वादांमधे गुंफत न जाता हातात सतेज ज्ञानाची मशाल घेऊन इस्रोसारखी ब्रम्हांडभरारी घ्यावी ही अपेक्षा ! आणि याच प्रेरणास्थानाच्या यशाला ज्यांनी आपली मोलाची वेळ वेचली त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला आणि कर्तुत्वाला माझा सलाम !!!! 

( माहितीस्रोत आणि प्रतिमा -www.isro.gov.in , Wikipedia )
-- वाघमारे तुषार पोपटराव,देवदैठण
९२७३१३००६३
tusharwaghmare441@gmail.com
tusharpwaghmare.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...