असह्य मदत
शीर्षक वाचून कुणीही चकीत होण्याचं कारण नाही. मुळात मदत ह्या शब्दाची आणि कृतीची आवश्यकता त्या व्यक्तीला असते, जिला आपण गरजू म्हणतो. मग कधीकधी आपणहून केलेली मदत समोरच्या व्यक्ती किंवा गोष्टीला असहनशील नसू शकते हे कशावरून?? मग मदतीलाही कुठेतरी मर्यादा असतात हे आपण विसरून चालणार नाही.
जे माणूसकीच्या प्रेमात असतात, सतत शब्दांत लपलेल्या भावना ते सोबत लपेटून फिरत असतात. मग ती लहान निरागस बाळाचे लाड पुरवणं असेल किंवा मग म्हातार्या अकृतिशील शरीराकडे पाहून गाठलेलं आदराचं आणि मायेचं शिखर असेल, तर कधी प्रामाणिक पशु-पक्षांबद्दल सहानुभूती असेल. तसंही आधुनिकतेच्या जगात अशी जिंदादील माणसं सापडणं मुश्कीलच म्हणा पण तरी वासरांत लंगडी गाय शहाणी या म्हणीच्या उकलीला साजेसे बरेच चेहरे मिळून जातात.
कधी कधी तयार झालेली सहानुभूती, गरज, दयाळूपणा कितपत योग्य आहे हे ठरवणंही तितकंच महत्वाचं वाटतं जितकं साधूने पोपटांना सांगितलेल्या पोपटपंचीचं कृतीत रूपांतर करणं महत्वाचं होतं. अशा वेळी पोपटपंची करून कृतीहीन पावलं नाचवणं योग्य नाही आणि त्याच कृतज्ञ पावलांनी मदतरूपी अंधानूकरण करणंही वेळेला वावगं ठरतं. अंड्याच्या टरफलातून बाहेर येण्यासाठी शक्ती पणाला लावणारं पिल्लू आठवा, या पिल्लाचे केवीलवाण्या प्रयत्नांची कुणाला बरे कीव नाही येणार? पण इथं कीव योग्य नव्हे. पिल्लाला बाहेर येण्यासाठी कृत्रिम या माणवनिर्मित परिस्थितीने ते कवच तोडलं तर आपली जीवनाची वात उजेड पडण्याआधीच त्या पिल्लाला विझवावी लागेल.मग या कृत्याला मदत हे नाव कितपत योग्य असेल??
बर्याच वेळा या मुद्द्यावर विचार करताना मला समोर आजची ऐशोआरामी जीवन जगणारी तरूण पिढी आठवते, ज्या पिढीला आपण समाजाचा एक घटक आहोत आणि काहीतरी त्यांच्याशी बांधिलकी असावी लागते, या विचाराची तीळमात्र चुणूक सुद्धा लागलेली नसते. मग यात दोष त्यांचा म्हणायचा की त्यांच्या सभोवतालच्या समाजाचा किंवा पालकांचा हो ?? कारण वरती म्हटल्याप्रमाणे जेव्हा मदत करण्यावेळची सहानूभूती आपली मर्यादा सोडून मनाला मदत करण्यात वाहावत असेल तर मग त्या मदतीचा भोक्ता कर्मपंगू होणार नाही कशावरून ? जर अबळ समजून पिल्लांना वाघीणीने शिकार करणंच शिकवलं नाही, किंवा मग अन्न मिळवायचे म्हटल्यावर *शिकार* नावाची कठीण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी लागते याची किमान जाणीवसुद्धा करून दिली नाही तर भविष्यात ते वाघीणीचं पिल्लू भूकेवाचून मरणार नाही कशावरून ? किंवा मग नाहीच राहवलं तर आपला मांसाहार सोडून शाकाहार करणार नाही कशावरून ? असंच काहीसं आपण आपल्या पाल्यांच्या बाबतीत तर करत नाही आहोत ना ! याचा विचार गांभिर्याने आजच्या पालकांनी करायला हवा.
आत्तापर्यंत बर्यापैकी कर्तुत्ववान व्यक्तिंच्या आपण यशोगाथा वाचल्या, ज्या कर्तुत्ववान व्यक्तींचं बालपण एकतर गरीब कुटूंबातील किंवा अतिशय खडतर गेलेलं आपल्याला आढळतं. सध्याही अशी खूप काही उदाहरणं सापडतील. मग आजची परिस्थिती सुधारली असताना आजच्या मुलांना अशी परिस्थिती कुठून आणणार ? हे आपल्या जरी हाताशी नसलं तरी आपण काही गोष्टी टाळल्या तरी खूप काही परिणाम या बाबतीत दिसून येईल. थोडक्यात म्हणजे आजच्या मुलांच्या फोफावत चाललेल्या भौतिक गरजा मग त्या अति लाडामुळे , एकूलते एक पणाच्या विचारसरणीत वाढवल्यामुळे असेल किंवा मग कौटूंबिक प्रतिष्ठेचा भाग म्हणून असेल. या गरजा जेव्हा कष्टाविना पूर्ण होत जातात तेव्हा त्याच क्षणाला त्या अत्युच्च दराने वाढायलाही सुरवात होते हे सत्य आहे. अशा आयत्या परिस्थितीत वाढलेल्या मुलांना पुढे पालकांचा आधार नसताना जेव्हा साधारण समस्या हाताळण्याची वेळ येते तेव्हा या समस्या त्यांना डोंगराएवढ्या वाटू लागतात. मग आपल्याच जीवनातील समस्या आपण सोडवू शकत नाही , समाजातील संघर्ष काय समजून घेणार !! हेच जर कठीण आणि गरीबी परिस्थितीची प्रत्यक्ष जाणीव झालेल्या , लहानपणापासून हरएक समस्या हाताखालून गेलेल्या पाल्यांना यशाची शिखरं ,शिखरं न वाटता त्या त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्यी टेकड्या असतात. आणि सोबत असलेल्या चटक्यांच्या जाणीनेणे या टेकड्या इच्छाशक्तीने आणि ध्यासाने कधीच पूर्ण केलेल्या असतात. तेव्हा पालकांनीही आपल्या पाल्याला लढायला शिकवा. त्यांना कर्मपंगू बनवण्यापासून वाचवायचं असेल, तुमच्या अनुपस्थितीत भविष्यात कसल्याही समस्येला निडरपणे तोंड देणारा नागरिक बनवायचं असेल तर त्यांच्या लढाया तुम्ही लढू नका. त्यांची शैक्षणिक , कार्यालयीन कामं तुम्ही लां उभे राहून त्यांच्याकडून करवून घ्या. अशा वेळी आपली ओळख बाजूला ठेवून त्याला समाजव्यवस्था कळू देत. आत्ता या लढाईत तुमचा पाल्य चितपट होताना तुम्ही शेवटच्या घडीला तुम्ही सावरायला आहात, पण तुम्ह नसताना ते ही लढाई नवशिक्यासारखी लढायला जातील, तेव्हा मात्र त्याची ढासळतं सैन्य ,धैर्य खचलेलं असेल आणि तुमचा पाल्य आयुष्याच्या या रणांगणात हारल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण आपल्या पाल्याचा हात कुठपर्यंत पकडून चालायचं हे आपणच ठरवा, म्हणजे आत्ता केलेली मदत भविष्यात असह्य होणार नाही. किमान आपण कुठल्याही पाल्याला आपल्या छोट्याछोट्या कृतींमधून जाणीव करून दिलीत तरी किमान आपला पाल्य ज्ञानी होईल की हे आपल्याला करायचं आहे, मग पुढची पायरी ते आमलात आणायचं की नाही हे तो ठरवेल.
या सहज लक्षात येणार्या गोष्टी आहेत की आपण कधीही भावनेच्या भारात म्हणा किंवा आपली सहानुभूती म्हणा यामुळे कधीही कुणालाही मदत करण्यास सज्ज असतो. ती मदत कधी कधी न मागताही द्यावी लागते तर कधी मागितल्यावर द्यावी लागते. मग जेव्हा समोरच्याने मदत न मागता आपण जी मदत करतो ती बरीच विचारपूर्वक करावी लागते. काही अंशी ही मदत त्या व्यक्तीला किंवा सजीवाला असह्यही होऊ शकते. नव्हे नव्हे तर कधी ती आपल्याही अंगावर बेतायला वेळ लागत नाही, कारण मदतीचं तत्वच आहे की मदत करताना ती निस्वार्थ आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय करायला हवी. अखेर लढाई आपल्या संवेदनशीलतेची आणि वैचारिक पवित्र्याची आहे.
"जिथे संवेदनशीलता, सहानुभूती जास्त आहे, तिथे विचारांचं प्रगल्भपण चालाखीला लावून योग्य तोच पवित्रा घ्यायला हवा."
-- तुषार पोपटराव वाघमारे,
देवदैठण.
९२७३१३००६३
Very nice....
ReplyDeleteछान आहे लेख.
ReplyDelete